बिहार फत्ते; आता 'या' दोन राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 20:04 IST2025-11-25T20:03:57+5:302025-11-25T20:04:51+5:30
Amit Shah : बिहार विजयानंतर भाजपने आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

बिहार फत्ते; आता 'या' दोन राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
Amit Shah : बिहार विधानसभा निवडणुकीत NDA ला मिळालेल्या प्रचंड यशानंतर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. बिहार फत्ते केल्यानंतर पक्षाने आगामी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच, बिहारप्रमाणेच या दोन राज्यांतही NDA सत्ता स्थापन करेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केला.
प्रत्येक घुसखोराला देशाबाहेर काढणार
गुजरातच्या मोरबी येथे भाजपच्या नव्या जिल्हा मुख्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित सभेत बोलताना शाह यांनी काँग्रेसवर घुसखोरांना पाठिंबा देत ‘व्होट बँके’चे राजकारण केल्याचा आरोप केला. त्यांनी स्पष्ट केले की, भाजपाचा प्रत्येक घुसखोराला देशाबाहेर हुसकावून लावण्याचा निर्धार आहे. देशाच्या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचा घुसखोरांना कोणताही अधिकार नाही.
शाह यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेच्या विरोधाला काँग्रेस, तृणमूल आणि इतर पक्षांची ‘राजकीय भूमिका’ असल्याचे म्हटले.
बिहार निवडणूक प्रचाराच्या वेळी अनेक राजकीय पंडितांनी NDA अपयशी ठरेल अशी भविष्यवाणी केली होती. परंतु बिहारच्या जनतेने दोन-तृतीयांश बहुमत देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. बिहारप्रमाणे पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतही NDA सरकार स्थापन करेल, असा दावा शाहांनी केला.
राहुल गांधींनी ‘घुसखोर बचाओ यात्रा’ काढली
शाह यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधत म्हटले की, बिहार निवडणुकांदरम्यान राहुल गांधी यांनी ‘घुसखोर बचाओ यात्रा’ काढली होती. स्वातंत्र्याची लढाई लढवणाऱ्या पक्षाची ही भूमिका धक्कादायक आहे. घुसखोरांना भारतात राहू द्यावे अशी मागणी करणे म्हणजे काँग्रेसचा राजकीय अधःपातच आहे, अशी घणाघाती टीकाही अमित शाहांनी यावेळी केली.