गोव्याहून दिल्लीला जात असलेल्या इंडिगोच्याविमानामधून प्रवास करत असलेल्या एका अमेरिकन महिलेचे काँग्रेसच्या महिला नेत्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे प्राण वाचल्याची थरारक घटना समोर आली आहे. डॉ. अंजली निंबाळकर असं या प्रसंगावधान दाखवून वेळीच मदत करणाऱ्या काँग्रेसच्या महिला नेत्याचं नाव असून. त्या कर्नाटक विधानसभेतील खानापूर मतदारसंघातील माजी आमदार आहेत.
या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार शनिवारी दुपारी गोव्याहून दिल्लीला जात असलेल्या इंडिगोच्याविमानाने उड्डाण केल्यानंतर दहा मिनिटांनी जेनी नावाच्या एका ३४ वर्षीय अमेरिकन महिलेला अस्वस्थ वाटू लागले. ती तिच्या बहिणीसोबत दिल्लीत एका लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी जात होती. दरम्यान, अचानक तिची प्रकृती बिघडू लागली आणि काही मिनिटांतच ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली.
या विमानातून कर्नाटकमधील काँग्रेसच्या माजी आमदा डॉ. अंजली निंबाळकर ह्या प्रवास करत होत्या. राजकारणात येण्यापूर्वी त्या वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय होत्या. त्यांनी या अमेरिकन महिलेची स्थिती पाहिली आणि त्वरित आपल्या सीटवरून उठून परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली. डॉ. अंजली निंबाळकर यांनी या महिलेला त्वरित सीपीआर देण्यास सुरुवात केली. त्यांनी जेनी हिला शुद्धीवर आणण्यासाठी आपलं सर्व वैद्यकीय कौशल्य पणाला लावत प्रयत्नांची पराकाष्ठा केली. डॉ. अंजली यांच्या प्रयत्नांमुळे जेनी शुद्धीवर आली.
जेनीची प्रकृती स्थिरस्थावर झाल्याचे पाहिल्यावर डॉ. अंजली निंबाळकर आपल्या सीटवर जाऊन बसल्या. मात्र ३० मिनिटांनंतर जेनी हिची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली. त्यानंतर डॉ. अंजली निंबाळकर या त्वरित मदतीस धावल्या. त्यांनी जेनी हिची प्रकृती स्थिर राखण्यासाठी मदत केली. दरम्यान, घाबरलेल्या जेनी हिने ‘तुम्ही कुठेही जाऊ नका’, असे डॉ. निंबाळकर यांचा हात पकडून सांगितले.
त्यानंतर डॉ. निंबाळकर संपूर्ण प्रवासात जेनी हिच्यासोबत राहिल्या. केबीन क्रूने मुख्य वैमानिकांना या मेडिकल एमर्जन्सीबाबत कल्ना दिली. त्यानंतर दिल्लीमध्ये या विमानाला प्राधान्यक्रम देऊन उतरवण्यात आले. तसेच जेनी हिला तातडीने अधिक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. अंजली निंबाळकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अमेरिकेतील या महिलेचे प्राण वाचले. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांनीही डॉ. अंजली निंबाळकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचं कौतुक केलं आहे.