'...तर आमच्या देशातून तुम्हाला बाहेर काढू', भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकन सरकारचा स्पष्ट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 18:41 IST2026-01-07T18:40:34+5:302026-01-07T18:41:51+5:30
American Visa: अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या किंवा आधीच तिथे असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

'...तर आमच्या देशातून तुम्हाला बाहेर काढू', भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकन सरकारचा स्पष्ट इशारा
American Visa: भारत-अमेरिका संबंधांमध्ये गेल्या काही महिन्यांत निर्माण झालेल्या तणावाचे पडसाद आता थेट विद्यार्थ्यांवरही उमटताना दिसत आहेत. भारतातील अमेरिकन दूतावासाने बुधवारी (7 जानेवारी 2026) भारतीय विद्यार्थ्यांसाठी इमिग्रेशन नियमांबाबत कडक इशारा दिला आहे. अमेरिकन कायद्यांचे उल्लंघन केल्यास विद्यार्थीव्हिसा रद्द होऊ शकतो आणि देशाबाहेर हकालपट्टीही होऊ शकते, असे दूतावासाने स्पष्ट केले आहे.
अमेरिकन व्हिसा अधिकार नाही, तर सुविधा
अमेरिकन दूतावासाने ‘X’ (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले आहे की, 'अमेरिकेचे कायदे मोडल्यास तुमच्या विद्यार्थी व्हिसावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तुम्हाला अटक झाली किंवा कोणताही कायदा मोडला, तर तुमचा व्हिसा रद्द केला जाऊ शकतो. तुम्हाला देशातून बाहेर काढले जाऊ शकते आणि भविष्यात अमेरिकेचा व्हिसा मिळण्यास अपात्र ठरवले जाऊ शकते. नियमांचे पालन करा आणि तुमचा शैक्षणिक प्रवास धोक्यात घालू नका. अमेरिकन व्हिसा हा अधिकार नाही, तर एक सुविधा आहे.'
Breaking U.S. laws can have serious consequences for your student visa. If you are arrested or violate any laws, your visa may be revoked, you may be deported, and you could be ineligible for future U.S. visas. Follow the rules and don’t jeopardize your travel. A U.S. visa is a… pic.twitter.com/A3qyoo6fuD
— U.S. Embassy India (@USAndIndia) January 7, 2026
या स्पष्ट शब्दांमुळे अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या किंवा आधीच तिथे असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
अवैध स्थलांतरावरही अमेरिकेचा कडक पवित्रा
अमेरिकेने यापूर्वीही भारतातून जाणाऱ्या अवैध स्थलांतरितांबाबत कठोर इशारे दिले आहेत. इमिग्रेशन कायदे मोडल्यास मोठ्या फौजदारी शिक्षेला सामोरे जावे लागू शकते, असे अमेरिकेने स्पष्ट केले होते.
अमेरिकी प्रशासन सध्या अवैध स्थलांतर, गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग आणि इमिग्रेशन नियमांचे उल्लंघन यासंबंधी प्रकरणांत व्हिसा रद्द करणे आणि देशाबाहेर काढणे अशा कठोर कारवाया करत आहे.
H-1B आणि विद्यार्थी व्हिसा नियम अधिक कठोर
अमेरिकन प्रशासन सध्या H-1B आणि विद्यार्थी व्हिसा नियम अधिक कडक करत आहे. याचा थेट परिणाम परदेशी, विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येवर दिसून येत आहे. आकडेवारीनुसार गेल्या वर्षी अमेरिकेतील नवीन आंतरराष्ट्रीय प्रवेशांमध्ये 17 टक्क्यांची घट झाली. ऑगस्ट 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या आगमनात वर्षागणिक 19 टक्के घट नोंदवण्यात आली. ही घट 2021 नंतरची सर्वात मोठी मानली जात आहे.