सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 12:13 IST2025-10-07T12:12:28+5:302025-10-07T12:13:02+5:30
एका सासूचे आपल्याच १८ वर्षीय जावयासोबत प्रेमसंबंध जुळले. या प्रेमसंबंधात दोघे इतके वेडे झाले की, त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

AI Generated Image
नात्यांमधील सर्व मर्यादा ओलंडणारी एक अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातून समोर आली आहे. या भागात राहणाऱ्या एका सासूचे आपल्याच १८ वर्षीय जावयासोबत प्रेमसंबंध जुळले. या प्रेमसंबंधात दोघे इतके वेडे झाले की, त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ते दोघे विवाहबंधनात अडकणार असताना पोटच्या मुलीनेच तो प्रकार पाहिला. तिने विरोध करताच, या सासू-जावयाने मिळून त्याच मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
सुदैवाने, वेळीच गावकऱ्यांनी धाव घेतल्यामुळे त्या मुलीचा जीव वाचला असून, सासू आणि जावयाला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केव्हीबीपुरम मंडलातील एका गावात ४० वर्षीय विधवा महिला आपल्या १५ वर्षीय मुलीसोबत राहत होती. अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच तिने आपल्या मुलीचा विवाह १८ वर्षांच्या युवकासोबत लावून दिला होता.
लग्नानंतरही मुलगी अनेकदा आपल्या आईकडे येत-जात होती आणि तिच्यासोबत जावईही घरी येत असे. याच भेटीगाठींमध्ये सासू आणि जावयामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. दोघांमध्ये इतकी जवळीक वाढली की, त्यांनी एकत्र लग्न करण्याचा निर्णय घेतला.
जेव्हा जावई सासूच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार होता...
सासू आणि जावयाने गुपचूप लग्नाची तयारी केली. लग्नाच्या दिवशी दोघेही नवरदेव-नवरीच्या वेशात तयार झाले. जावई सासूच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार, इतक्यात त्याची पत्नी म्हणजेच सासूची मुलगी तिथे पोहोचली. हा धक्कादायक प्रकार पाहून मुलीने जोरजोरात आरडाओरड केली. "तुम्ही दोघे हे काय करत आहात!" असे म्हणत तिने त्या लग्नाला विरोध केला.
विरोध करणाऱ्या मुलीवरच हल्ला
या प्रकारानंतर तिघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. वाद विकोपाला जाताच, सासूने जावयाच्या मदतीने आपल्या पोटच्या मुलीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली.
घरातून आरडाओरड ऐकून स्थानिक गावकरी त्वरित घटनास्थळी धावले. त्यांनी गंभीर जखमी झालेल्या मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत. संतप्त गावकऱ्यांनी सासू आणि जावयाला बेदम चोप दिला आणि त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी पीडित मुलीच्या जबाबावरून गुन्हा दाखल करत सासू आणि जावयाला त्वरित अटक केली असून, त्यांना कारागृहात पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे तिरुपती जिल्ह्याच्या केव्हीबीपुरम मंडलात संतापाची लाट उसळली आहे.