धोक्याची घंटा; कोरोनामुळे लहान मुलांच्या लसीकरणात ४० टक्क्यांनी घट ; जगभरात केलेल्या सर्वेक्षणातून माहिती समोर  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 12:01 PM2020-05-25T12:01:19+5:302020-05-25T12:19:18+5:30

दर आठवड्याला अर्धवट लसीकरण झालेल्या किंवा लसीकरण न झालेली सुमारे साडेपाच लाख मुले

Alert ; Vaccination of children reduces by 40% percent due to Corona | धोक्याची घंटा; कोरोनामुळे लहान मुलांच्या लसीकरणात ४० टक्क्यांनी घट ; जगभरात केलेल्या सर्वेक्षणातून माहिती समोर  

धोक्याची घंटा; कोरोनामुळे लहान मुलांच्या लसीकरणात ४० टक्क्यांनी घट ; जगभरात केलेल्या सर्वेक्षणातून माहिती समोर  

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिओ, क्षयरोग, गोवर, कांजिण्या अशा आजारांसाठी व रोगप्रतिकारक क्षमतेसाठी लसीकरणलस न मिळाल्याने तब्बल 8 कोटी मुलांचा जीव धोक्यात असल्याची माहितीपाच वर्षांखालील मुलांचे नियमित लसीकरण वेळापत्रकानुसार होणे अत्यंत आवश्यक

प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : कोरोना संक्रमणाच्या काळात लहान मुलांच्या लसीकरणात ४० टक्क्यांनी घट झाल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने जगभरात केलेल्या सर्वेक्षणातून हे आकडे समोर आले आहेत. लसीकरणात होत असलेली घट म्हणजे भविष्यातील संकटाला दिलेले आमंत्रण आहे, अशा शब्दांत वैद्यकीय तज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे. दर आठवड्याला अर्धवट लसीकरण झालेल्या किंवा लसीकरण न झालेली सुमारे साडेपाच लाख मुले आढळून येत आहेत.

कोरोना विषाणूच्या संसगार्मुळे सर्वच दैनंदिन व्यवहारांवर, वैद्यकीय प्रक्रिया, शस्त्रक्रिया, वेळापत्रकावर विपरीत परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनावरील उपचारांसाठी आरोग्य यंत्रणा झटत असताना इतर आजार, शस्त्रक्रिया, उपचार लांबणीवर पडले. याचाच परिणाम लहान मुलांच्या लसीकरणावर झाला आहे. लहान मुलांना घेऊन घराबाहेर पडल्यास कोरोना संसर्ग होईल, या भीतीने पालकांनी लसीकरणच लांबणीवर टाकले आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये लसीकरणासाठी येणाऱ्या १ महिना ते दीड वर्षे या वयोगटातील मुलांचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटल्याचे बालरोगतज्ञ डॉ. प्रतिभा भोसले यांनी 'लोकमत'ला सांगितले. 
लसीकरण हा बाळाच्या संगोपनातला महत्वाचा घटक आहे. पोलिओ, क्षयरोग, गोवर, कांजिण्या अशा विविध आजारांपासून लहान मुलांचे संरक्षण व्हावे आणि त्यांच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढावी, यादृष्टीने लसीकरण अत्यंत महत्वाचे ठरते. मात्र, कोरोना काळात कोरोनामुळे लसीकरण मोहीम रखडली आहे. लस न मिळाल्याने तब्बल 8 कोटी मुलांचा जीव धोक्यात असल्याची माहितील
जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केली आहे.
भारतीय बालरोगतज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग म्हणाले, 'कोरोना साथीमुळे अर्धवट लसीकरण झालेल्या किंवा अजिबात लसीकरण न झालेल्या मुलांचे प्रमाण वाढत आहे.  पाच वर्षांखालील मुलांचे नियमित लसीकरण वेळापत्रकानुसार होणे अत्यंत आवश्यक आहे. पालकांच्या मनात घरातून बाहेर पडण्याबाबत भीती आहे. काही वेळा वाहनांची उपलब्धता नाही. काही ठिकाणी दवाखाने बंद आहेत. अशा परिस्थितीत लसीकरण वेळापत्रकानुसार न होता विस्कळित झाले आहे. 
-----
लसीकरणात दिरंगाई नको : डॉ. प्रमोद जोग
नवजात जन्म झालेल्या बाळाला बी.सी.जी, कावीळ आणि पोलिओ; दीड, अडीच आणि साडे तीन महिन्याला देण्यात येणा?्या ट्रिपल, हिब, हिपाटाईटिस बी, रोटा, न्यूमोनिया या लसी वेळापत्रकानुसार देण्यात याव्यात. सहा महिने पूर्ण झाल्यावर इनफ्लुएनझा प्रतिबंधक लसीची दोन  इंजेक्शन्स (महिन्याच्या अंतराने) देण्यात यावीत. नऊ महिने पूर्ण झालेल्या बाळाला गोवर, गालगुंड, जर्मन गोवर ही लस द्यावी. उन्हाळ्यात कांजिण्याचे रुग्ण देखील आढळू लागले आहेत. पंधरा महिने पूर्ण झाल्यावर बाळाला कांजिण्याची लस द्यावी. पोलिओ आणि गोवरसारखे आजार आजवर अथक प्रयत्न करून आटोक्यात आले. नियमित लसीकरणात ढिसाळपणा झाल्यास या आजारांचे प्रमाण वाढण्यास वेळ लागणार नाही. 
इनफ्लुएनझा, गोवर, न्यूमोनिया हे आजार  देखील  श्वसन संस्थेवर परिणाम  करतात. कोरोना बाधित रुग्णाला असे आजार झाल्यास गुंतागुंत वाढते. लसी घेतलेल्या असतील तर करोनाच्या उपचारादरम्यान या आजारांची शक्यता कमी होते.

Web Title: Alert ; Vaccination of children reduces by 40% percent due to Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.