अजित पवारांचा मृतदेह 'असामान्य' सुजला होता! रोहित पवारांचा दिल्लीतून खळबळजनक खुलासा; मृत्यूचं गूढ वाढलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 16:32 IST2026-02-11T16:30:53+5:302026-02-11T16:32:01+5:30
Rohit Pawar in Delhi : रोहित पवार यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या अपघाताबाबत नवा खुलासा केला आहे. मृतदेह असामान्यपणे सुजलेला असल्याचा डॉक्टरांचा दावा त्यांनी समोर आणला. वाचा सविस्तर.

अजित पवारांचा मृतदेह 'असामान्य' सुजला होता! रोहित पवारांचा दिल्लीतून खळबळजनक खुलासा; मृत्यूचं गूढ वाढलं
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली असतानाच, आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर मोठे खुलासे करण्यास सुरुवात केली आहे. "अजित दादांचा मृतदेह असामान्यपणे खूप जास्त सुजलेला होता," असा धक्कादायक खुलासा रोहित पवार यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केला आहे.
रोहित पवारांनी व्हीएसआर विमान कंपनी आणि डीजीसीएसह विमानाचा वादग्रस्त पायलट यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मंगळवारी त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आज त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत नवा खुलासा केला आहे.
भाजल्यानंतर शरीर इतकं सुजतं का?
मुंबईतील पत्रकार परिषदेत ही बाब टाळली होती, असे सांगत रोहित पवारांनी दिल्लीत डॉक्टरांसोबत झालेल्या चर्चेचा दाखला दिला. ते म्हणाले, "मी जेव्हा डॉक्टरांना विचारलं की, शरीर भाजल्यानंतर इतकं सुजतं का? तेव्हा त्यांनी हो असं उत्तर दिलं. मात्र, दादांची बॉडी ही सामान्यापेक्षा खूप जास्त सुजलेली होती, असे डॉक्टर म्हणाले होते. ती इतकी का सुजली होती, याचं कारण शोधणं आता महत्त्वाचं आहे."
सोशल मीडियावरील 'त्या' फोटोंवर शिक्कामोर्तब?
विमान अपघातानंतर सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते, ज्यामध्ये मृतदेह ओळखता येत नव्हता आणि तो मोठ्या प्रमाणात फुगल्याचा दावा केला जात होता. रोहित पवारांच्या आजच्या खुलाशामुळे त्या फोटोंबाबत आणि एकूणच अपघाताच्या तीव्रतेबाबत आता नवीन प्रश्न उपस्थित होत आहेत.
अपघातामागे काही वेगळं कारण?
रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या या संशयामुळे आता तपासाची दिशा बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केवळ विमान अपघात की त्यामागे आणखी काही 'असामान्य' घडले होते, याबाबत आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.