एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन 'लँडिंग'; हवेत असतानाच इंजिनला लागली आग, प्रवासी सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 10:50 IST2025-08-31T10:49:33+5:302025-08-31T10:50:15+5:30
Air India Flight AI2913 catches fire : कॉकपिट क्रूला उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याचे अलार्ममुळे कळले...

एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन 'लँडिंग'; हवेत असतानाच इंजिनला लागली आग, प्रवासी सुखरूप
Air India Flight AI2913 catches fire : दिल्लीहून इंदूरला जाणारे एअर इंडियाचे फ्लाइट AI2913 टेकऑफ केल्यानंतर लगेचच दिल्लीला परतले. विमानाच्या कॉकपिट क्रूला उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याचे संकेत मिळाले. त्यानंतर, मानक प्रक्रियेनुसार, इंजिन बंद करण्यात आले आणि विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमान चौकशीसाठी ग्राउंड करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी, पर्यायी विमान तात्काळ उपलब्ध करून देण्यात आले आहे, जे त्यांना इंदूरला घेऊन जाईल.
वैमानिकाच्या सतर्कतेमुळे अपघात टळला
अलार्म वाजताच आणि कॉकपिटमध्ये आगीचे संकेत मिळाले. विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली. परंतु वैमानिकाने तातडीने आवश्यक ती खबरदारी घेतली आणि इंजिन बंद करून विमान हवेत नियंत्रणात ठेवले, त्यानंतर वैमानिकाने दिल्ली विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरवले. काही मिनिटांतच सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
एअर इंडियाच्या विमानांमध्ये सातत्याने तांत्रिक बिघाड
एअर इंडियाच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना वारंवार घडत असतात. अलिकडेच, १८ ऑगस्ट रोजी, कोची विमानतळावरून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक उड्डाणापूर्वी थांबवावे लागले. यापूर्वी १६ ऑगस्ट रोजी एअर इंडियाने मिलान (इटली) ते दिल्लीला जाणारे विमान शेवटच्या क्षणी रद्द केले होते. दोन्ही घटनांमागे तांत्रिक बिघाड हे कारण असल्याचे सांगण्यात आले होते. एअरलाइनच्या विमानांमध्ये सतत अशा समस्या येत असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.