बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 21:06 IST2025-06-20T21:05:49+5:302025-06-20T21:06:21+5:30
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात मृत्यूमुखी पडेल्या आजी-नातीचे मृतदेह आज कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले.

बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
Air India Plane Crash: गुजरातच्या अहमबादमध्ये १२ जून 2025 रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमानअपघातात २४१ प्रवाशांसह अनेक स्थानिकांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत ज्या मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर विमान कोसळले, त्यात काम करणाऱ्या स्वयंपाकी सरलाबेन ठाकोर आणि त्यांची दोन वर्षांची नात आद्या हिचाही मृत्यू झाला आहे. डीएनए चाचणीतून त्यांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे.
५२ वर्षीय सरलाबेन ठाकोर गेल्या १५ वर्षांपासून बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृह परिसरातील मेसमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत होत्या. अपघाताच्या दिवशी त्या त्यांची नात आद्यासोबत मेसमध्ये होत्या, तर त्यांचा मुलगा रवी ठाकोर आणि सून ललिता, जी मेसमध्येच काम करतात, डॉक्टरांचे टिफिन देण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले होते. शुक्रवारी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमधून दोघींचे मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले.
माध्यमांशी बोलताना रवी ठाकोर म्हणाले, "घटनेच्या दिवशी दुपारी १ वाजता मी आणि माझी पत्नी मेसमधून बाहेर पडलो. दुपारी १:४० वाजता आम्हाला बातमी मिळाली की, मेस आणि वसतिगृहाच्या इमारतीवर विमान कोसळले आहे. आम्ही घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा सर्व काही जळून खाक झाले होते. त्या दिवसापासून माझी आई आणि मुलीचा काहीच ठावठिकाणा नव्हता."
डीएनए चाचणीतून खुलासा
अपघातानंतर अपघातस्थळावरून अनेक मृतदेह विद्रूपावस्थेत पडले होते, ज्यामुळे मृतांची ओळख पटवणेही अत्यंत कठीण होते. कुटुंबातील सदस्यांनी सरलाबेन आणि आद्या यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु कोणतीही स्पष्ट माहिती मिळू शकली नाही. अखेर डॉक्टरांच्या पथकाने अपघातस्थळी सापडलेल्या अवशेषांचे डीएनए नमुने घेतले आणि ते कुटुंबातील सदस्यांच्या नमुन्यांशी जुळवले. आठवड्याभराच्या चाचणीनंतर आज(२० जून) डीएनए चाचणीचा अहवाल आला, ज्यात मृतांमध्ये सरलाबेन ठाकोर आणि तिची नात आद्या यांचा समावेश असल्याचे पुष्टी झाली. या घटनेची माहिती मिळताच ठाकोरे कुटुंबात शोककळा पसरली आहे.