बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 06:31 IST2025-07-15T06:24:28+5:302025-07-15T06:31:00+5:30
Air India Plane Crash: अमेरिकन नियामक फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (एफएए) २०१८ मध्ये ७८७ आणि ७३७ सह बोईंग विमानांच्या काही मॉडेल्समध्ये इंधन नियंत्रित करणाऱ्या ‘स्विच लॉकिंग’ सुविधेत बिघाड होण्याची शक्यता वर्तवली होती.

बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : विमान वाहतूक नियामक डीजीसीएने सोमवारी विमान कंपन्यांना त्यांच्या बोईंग ७८७ आणि ७३७ विमानांमधील ‘फ्युएल स्विच लॉकिंग’ प्रणाली तपासण्यास सांगितले आहे. एअर इंडियाच्या बोईंग ७८७ विमानाच्या अपघाताच्या प्राथमिक चौकशी अहवालानंतर काही दिवसांनी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अमेरिकन नियामक फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (एफएए) २०१८ मध्ये ७८७ आणि ७३७ सह बोईंग विमानांच्या काही मॉडेल्समध्ये इंधन नियंत्रित करणाऱ्या ‘स्विच लॉकिंग’ सुविधेत बिघाड होण्याची शक्यता वर्तवली होती. तथापि, यात सुरक्षिततेच्या चिंतेचा विषय असल्याचे संकेत नव्हते.
डीजीसीएने म्हटले आहे की, त्यांच्या निदर्शनास आले आहे की अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत कंपन्यांनी त्यांच्या विमान ताफ्याची तपासणी सुरू केली आहे. सर्व विमान कंपन्यांना २१ जुलै २०२५ पूर्वी तपासणी पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
तपासणी पूर्ण झाल्यानंतर याचा अहवाल संबंधित प्रादेशिक कार्यालयासह या कार्यालयाला देण्यात यावा. एएआयबीने अहवालात म्हटले आहे की, एअर इंडियाचे विमान एआय-१७१ च्या दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा करणारे स्विच टेक ऑफच्या काही सेकंदातच बंद करण्यात आले होते, ज्यामुळे ते लगेचच कोसळले.
यांत्रिक वा देखभाल मुद्द्याचा उल्लेख नाही : एअर इंडिया सीईओ विल्सन
कोसळलेल्या विमानाच्या प्राथमिक अहवालाने आणखी प्रश्न उपस्थित केले आहेत, असे एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी म्हटले आहे. वैमानिक व विमानाच्या फिटनेसचा बचाव करताना ते म्हणाले, विमानाच्या इंजिनात कोणत्याही प्रकारची यांत्रिक समस्या असल्याचा उल्लेख अहवालात नाही. तसेच देखभाली संदर्भातील मुद्द्याचा उल्लेख केलेला नाही. कारण देखभालीसंदर्भातील सर्व कामे पूर्ण केली होती. दुर्घटनेनंतर काही दिवसांत सतर्कता बाळगली. डीजीसीएच्या निगराणीत ताफ्यातील बोइंग ७८७ विमानांची तपासणी करण्यात आली व ते सेवेसाठी उपयुक्त असल्याचे निष्पन्न झाले, असे ते म्हणाले.
मानवी चुकीमुळे स्वीच बंद झाले : तज्ज्ञ
विमान उड्डयण क्षेत्रातील तज्ज्ञ कॅप्टन मोहन रंगनाथन यांच्यानुसार, अहमदाबाद अपघातापूर्वी विमानाच्या इंधनाचे स्वीच मानवी चुकीमुळेच बंद झाले होते. विमान अपघात तपास ब्युरोचा प्राथमिक अहवाल अधिक पारदर्शक असायला हवा होता, असे मतही त्यांनी मांडले. वैमानिकांना प्रशिक्षण देणारे पहिले प्रशिक्षक म्हणून ओळख असलेले रंगनाथन म्हणतात, इंधनाचे हे स्वीच आपोआप बंद किंवा चालू होऊ शकत नाही. त्याला कुणीतरी खाचेतून बाहेर काढूनच हाताने बंद किंवा चालू करावे लागते.