"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 03:31 IST2025-04-21T03:31:10+5:302025-04-21T03:31:38+5:30
ओवेसी म्हणाले, "तुम्ही लोक सत्तेवर आहात आणि एवढे कट्टरपंथी झाला आहात की, न्यायालयालाही धार्मिक युद्धाची धमकी देत आहात. मोदीजी, जर आपण या लोकांना रोखले नाही, तर..."

"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सर्वोच्च न्यायालयासंदर्भात केलेल्या विधानावरून, विरोधक आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात, एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. "तुम्ही लोक (भाजप) ट्यूबलाईट आहात. अशाप्रकारे न्यायालयाला धमकावत आहात. संविधानातील कलम १४२ काय आहे, हे आपल्याला माहीत आहे का? ते बीआर आंबेडकर यांनी तयार केले होते. ते आपल्यापेक्षा अधिक दूरदृष्टी असलेले व्यक्ती होते. भाजप फशवणूक करत आहे आणि धार्मिक युद्धाची धमकी देत घाबरवत आहे.
ओवेसी पुढे म्हणाले, तुम्ही लोक सत्तेवर आहात आणि एवढे कट्टरपंथी झाला आहात की, न्यायालयालाही धार्मिक युद्धाची धमकी देत आहात. मोदीजी, जर आपण या लोकांना रोखले नाही, तर देश कमकुवत होईल. देश आपल्याला माफ करणार नाही आणि उद्या आपण सत्तेवर नसाल. वक्फ कायदा झाल्याने नोकरी मिळणार आहे का? हे भारतातील हिंदूंच्या लक्षात आले आहे. भाजप मुस्लिमांप्रती द्वेष पसरवून मते मिळवते, हे हिंदूंना समजले आहे. दाखवण्यासाठी काही नाही. ४.५ टक्के तरुण बेरोजगार आहेत. त्यांची बेरोजगारी दूर करण्यासाठी कसलीही योजना नाही.
नेमकं काय म्हणाले होते निशिकांत दुबे? -
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयासंदर्भात भाष्य केले होते. "देशातील वाढत्या धार्मिक तणावासाठी सर्वोच्च न्यायालय जबाबदार आहे. न्यायालय आपल्या मर्यादा ओलांडत आहे. न्यायालय संसदेने पारित केलेले कायदे रद्द करत आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करणाऱ्या राष्ट्रपतींनाही निर्देश देत आहे."
दुबे पुढे म्हणाले, "संविधानाच्या कलम ३६८ नुसार, कायदे करणे हे संसदेचे काम आहे आणि न्यायालयाची भूमिका कायद्याची व्याख्या करणे आहे. जर प्रत्येक कामासाठी सर्वोच्च न्यायालयातच जायचे असेल तर, संसद बंद करावी का? जर प्रत्येक गोष्टीसाठी कायदा बनला आहे, तर सर्वोच्च न्यायालय नवीन कायदा कुठून आणि कसा बनवत आहे?"