मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर बांदा तुरुंगाच्या जेलरला जीवे मारण्याची धमकी, तक्रार दाखल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 21:27 IST2024-04-01T21:27:09+5:302024-04-01T21:27:43+5:30
Threat to Banda Jail Superintendent: काही दिवसांपूर्वीच मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर बांदा तुरुंगाच्या जेलरला जीवे मारण्याची धमकी, तक्रार दाखल...
Threat to Banda Jail Superintendent: उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात मुख्तार अन्सारी याचा मृत्यू झाला, त्याच दिवशी तुरुंग अधीक्षकांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी मिळाल्यानंतर कारागृह अधीक्षकांनी अज्ञाताविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. फोन करणाऱ्या व्यक्तीने जीवे मारण्याच्या धमकीसोबतच अश्लील शिवीगाळही केली. सध्या कारागृह अधीक्षकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
तुरुंग अधीक्षक वीरेश राज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीयूजी क्रमांकावर एका अनोळखी व्यक्तीने कॉल केला आणि तुला मारणार, पळून जाता येत असेल तर पळून जा, असे म्हटले. तसेच, अश्लील शिवीगाळही केली. हा कॉल अवघ्या 14 सेकंदांचा होता. याप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, त्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.
कुटुंबीयांचा गंभीर आरोप
गेल्या महिन्यात 28 मार्च रोजी बांदा कारागृहात कैद असलेल्या मुख्तार अन्सारीची प्रकृती खालावल्यानंतर त्याला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अन्सारी मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी स्लो पॉयझन दिल्याचा आरोप केला आहे. आता याप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.