मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 02:22 IST2025-05-17T02:21:15+5:302025-05-17T02:22:24+5:30
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले की, भाजप नेत्यांकडून लष्कराचा सातत्याने अपमान लज्जास्पद व दुर्दैवी आहे.

मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
जबलपूर/इंदूर : ऑपरेशन सिंदूरसारखी यशस्वी कारवाई केल्याबद्दल आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. संपूर्ण देश, देशाचे लष्कर व जवान मोदी यांच्या पायाशी नतमस्तक झाले, असे वादग्रस्त विधान मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी एका कार्यक्रमात केले. यावर देवडा यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले की, देशाचे लष्कर मोदींच्या पायाशी नतमस्तक आहे असे सांगून देवडा यांनी लष्कराच्या शौर्याचा अपमान केला आहे. भाजप नेत्यांकडून लष्कराचा सातत्याने अपमान लज्जास्पद व दुर्दैवी आहे.
मंत्र्याची हकालपट्टी करा, काँग्रेसची मागणी
काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी पत्रकार परिषदेत देवडा यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ दाखविला. त्यानंतर त्यांनी सवाल केला की, कोणताही सच्चा भारतीय नागरिक असे धक्कादायक आणि लज्जास्पद विधान करू शकतो का? देवडा यांना उपमुख्यमंत्रिपदावरून तत्काळ हटवावे, अशी मागणी श्रीनेत यांनी पंतप्रधान मोदी यांना केली आहे. देवडा म्हणाले की, माझ्या विधानाचा विपर्यास करून त्याला चुकीच्या पद्धतीने सादर करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
भाजपकडून देवडा यांचा बचाव
वाद वाढल्यानंतर उपमुख्यमंत्री देवडा यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, 'माझे विधान चुकीच्या पद्धतीने सादर केले जात आहे.' भाजपनेही देवडा यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. भाजपचे प्रवक्ते आशिष अग्रवाल म्हणाले की, काँग्रेस देवडा यांच्या विधानाचा विपर्यास करत आहे. त्यांना देशाच्या सैन्याबद्दल किंवा देशाबद्दल आदर नाही. (वृत्तसंस्था)