बापरे! नवऱ्याशी भांडल्यावर चिडली, गंगेत उडी मारली; मगर दिसताच रात्रभर झाडावर बसली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 12:18 IST2025-09-08T12:18:14+5:302025-09-08T12:18:56+5:30
चहा बनवण्यावरून पती-पत्नीत भांडण झालं, पुढे हा वाद इतका वाढला की, पत्नीने रागाच्या भरात गंगा नदीत उडी मारली.

फोटो - आजतक
कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चहा बनवण्यावरून पती-पत्नीत भांडण झालं, पुढे हा वाद इतका वाढला की, पत्नीने रागाच्या भरात गंगा नदीत उडी मारली. पण नशिबाचा खेळ पाहा, मरण्यासाठी उडी मारणारी महिला नेमकी मगरीच्या समोर आली. यानंतर महिला आपला जीव वाचवण्यासाठी जवळच्या झाडावर चढली आणि तिथेच संपूर्ण रात्र घालवली.
अहिरवान येथील सुरेशचे अनेकदा पत्नी मालतीशी कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण होत असे. शनिवारी रात्री उशिराही असंच काहीसं घडलं. सुरेशने त्याच्या पत्नीला चहा बनवण्यास सांगितलं. मध्यरात्र झाली होती, मालती थकली होती म्हणून तिने नकार दिला. यानंतर दोघांमध्ये भांडण झालं. चिडलेली मालती थेट जाजमऊच्या गंगा पुलावर पोहोचली. राग इतका होता की तिने विचार न करता पुलावरून गंगेत उडी मारली.
गंगेचा जोरदार प्रवाह, दाट अंधार आणि मगरींचा धोका
लहानपणापासून पोहायला येत असल्याने ती किनाऱ्याकडे पोहत गेली पण तेव्हा अचानक तिला पाण्यात एक मोठी मगर दिसली. मालती खूप घाबरली. तिला जवळच एक झाड दिसलं. जीव वाचवण्यासाठी ती पटकन त्या झाडावर चढली आणि रात्रभर तिथेच बसून राहिली. गंगेचा जोरदार प्रवाह, दाट अंधार आणि मगरींचा धोका असल्याने मालतीने संपूर्ण रात्र झाडावर बसून घालवली.
मदतीसाठी मारली हाक
सकाळी जवळच्या गावातील लोक गंगा नदीच्या काठावरून जात असताना, झाडावर बसलेल्या मालतीने मदतीसाठी हाक मारली. सुरुवातीला लोकांना आश्चर्य वाटलं की एक महिला झाडावर का बसली आहे. मालतीने रडत रडत संपूर्ण कहाणी सांगितली तेव्हा गावकऱ्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवलं. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी तिचा पती सुरेशलाही बोलावलं. तेव्हा हा संपूर्ण प्रकार समोर आला. या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे.