After the Cabinet expansion in Karnataka, dissent among Congress and JDS MLAs | कर्नाटकमधील मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेस, जेडीएसच्या आमदारांमध्ये असंतोष
कर्नाटकमधील मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेस, जेडीएसच्या आमदारांमध्ये असंतोष

बंगळुरू - खातेवाटपावरून खोळंबलेला कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर बुधवारी झाला. मात्र या विस्तारानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरच्या आमदारांची नाराजी उफाळून आली आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांचे समर्थकांनी रस्त्यावर उतरून विरोध नोंदवला, तर काही समर्थकांनी अंगावर रॉकेल ओलून आत्मदन करण्याचा प्रयत्न केला. 

बुधवारी झालेल्या कुमारस्वामी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काँग्रेसच्या 15 तर जनता दल सेक्युलरच्या 10 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राज्यातील काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना स्थान देण्यात न आल्याने त्यांची आणि त्यांच्या समर्थकांची नाराजी प्रकर्षाने समोर आली. सिद्घारामय्या सरकारमध्ये महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या नेत्यांना मंत्रिपद देण्यात आले नाही.  एच.के. पाटील, रामलिंग रेड्डी, रोशन बेग, एम.बी. पाटील आणि तन्वीर सैत आदी नेत्यांचे नाव मंत्रिपदासाठी शर्यतीत होते. मात्र शेवटच्या क्षणी या सर्वांना धक्का देत नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. 

त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले. कर्नाटकमध्ये लिंगायतांना वेगळ्या धर्माचा दर्जा देण्यासाठी आग्रही असलेल्या एम. बी. पाटील यांनी पक्ष सोडण्याची धमकी दिली.  त्यामुळे त्यांची मनधरणी करण्यासाठी कुष्ण बैरगौडा आणि विनय कुलकर्णी यांची पाठवणी करण्यात आली. तर एच. के. पाटील यांच्या समर्थकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची धमकी दिली. दुसरीकडे तन्वीर सैत यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून स्वत:वर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. राज्यातील नेत्यांना या निवडणुकीचे योग्य महत्त्व न समजल्याने आणि सरकारमध्ये दुय्यम सहकारी म्हणून सहभागी व्हावे लागल्याने संतप्त झालेल्या पक्षश्रेष्ठींनी राज्यातील काही नेत्यांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे. 

दुसरीकडे जनता दल सेक्युलरलाही आमदारांच्या नाराजीचा सामना करावा लागला. एम.सी. मनुगुली यांचे समर्थक तर माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या घरी मोर्चा घेऊन गेले. मात्र मनुगुली यांचे नाव संभाव्य मंत्र्यांच्या यादीत असल्याचे समजल्यावर ते शांत झाले. दरम्यान, काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काँग्रेसने 7 तर जनता दल सेक्युलरने  6 नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे.  
 

Web Title: After the Cabinet expansion in Karnataka, dissent among Congress and JDS MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.