१०२ व्या दुरुस्तीनंतर आरक्षणाचे अधिकार राज्यांकडे नाही, तर केंद्राकडे हे निकालातून अधोरेखित : अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 23:06 IST2021-07-01T23:05:00+5:302021-07-01T23:06:43+5:30
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वाच्च न्यायालयात केंद्रानं दाखल केली होती पुनर्विचार याचिका. न्यायालयानं फेटाळली केंद्राची याचिका.

१०२ व्या दुरुस्तीनंतर आरक्षणाचे अधिकार राज्यांकडे नाही, तर केंद्राकडे हे निकालातून अधोरेखित : अशोक चव्हाण
मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारनं दाखल केलेली पुनर्विचार याचिता सर्वोच्च न्यायालयानं फेटाळत मोठा झटका दिला आहे. यापूर्वी ५ मे रोजी राज्य सरकारचा कायदा रद्द ठरवला होता. १०२ व्या घटना दुरूस्तीनंतर राज्यांना SEBC कायद्याअंतर्गत एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा अधिकार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठानं दिला होता. न्यायमूर्ती एल. नागेश्वरा राव, न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. दरम्यान, यानंतर अशोक चव्हाण यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिला आहे.
"संसदेच्या १०२ व्या घटना दुरुस्ती बाबत केंद्र सरकारची पूनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याला मोठा धक्का बसला आहे. या घटना दुरूस्ती नंतर आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांकडे नव्हे तर केंद्राकडे आहेत, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून अधोरेखित झाले. त्यामुळे आता केंद्राने घटना दुरुस्ती करून राज्यांना आरक्षणाचे अधिकार पुन्हा बहाल करणे तसेच आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करणे आवश्यक झाले आहे," असं अशोक चव्हाण म्हणाले.
"मराठा आरक्षणावर विरोधकांनी कितीही राजकारण केले असले तरी आम्ही या विषयावर राजकारण करणार नाही. पूनर्विलोकन याचिका करताना केंद्र सरकार कमी पडले, असा राजकीय आरोप आम्ही करणार नाही. ही राजकारण करण्याची वेळ नाही, तर सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे बाजू मांडून केंद्र सरकारच्या माध्यमातून घटना दुरुस्ती केली पाहिजे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी आहे," असंही त्यांनी नमूद केलं.