अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 23:50 IST2025-05-15T23:50:02+5:302025-05-15T23:50:57+5:30

Operation Sindoor: अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली

afghanistan fm mawlawi amir khan muttaqi hold a phone call with indian eam s jaishankar | अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानला जागा दाखवून दिली. भारताच्या या कारवाईलाही जगातील अनेक देशांनी पाठिंबा दर्शवला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अचानक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम घोषित केला. परंतु, आता ट्रम्प यांनी यावरून यु टर्न घेतल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अनेक देशांनी भारताचा विजय झाला असून, पाकिस्तानचा दारूण पराभव झाल्याचे मान्य केले आहे. यातच अफगाणिस्तानने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. 

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. एक्सवरील पोस्टमध्ये एस. जयशंकर म्हणतात की, आज सायंकाळी अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी यांच्याशी चांगली चर्चा झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. याबाबत त्यांचा मनापासून आभारी आहे. खोट्या आणि निराधार वृत्तांद्वारे भारत आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव असल्याच्या दाव्यांना त्यांनी ठामपणे नकार दिला. या गोष्टीचे स्वागत आहे. तसेच या चर्चेत अफगाणिस्तानातील जनतेसोबतची आपली पारंपारिक मैत्री आणि त्यांच्या विकासाच्या गरजांसाठी सतत पाठिंबा देण्यावर भर दिला. दोन्ही देशांतील सहकार्य पुढे नेण्याबाबतही चर्चा झाली, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. 

भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा 

अफगाणिस्तानच्या मुंबईतील दूतावासानेही याबाबत एक्सवर एक पोस्ट करत माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी द्विपक्षीय संबंध मजबूत करणे, व्यापार वाढवणे, राजनैतिक संबंध आणि चाबहार बंदरातून सहकार्य यावर चर्चा केली. व्हिसा सुविधा आणि अफगाण कैद्यांच्या सुटकेवरही चर्चा झाली, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामाबाबत मोठे दावे करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्व वाढत आहे, म्हणून आम्ही समस्या सोडवण्यास मदत केली आहे. मी असे म्हणत नाही की, मी मध्यस्थी केली. मी समस्या सोडवण्यास मदत केली, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Web Title: afghanistan fm mawlawi amir khan muttaqi hold a phone call with indian eam s jaishankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.