अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 13:10 IST2025-10-09T13:09:37+5:302025-10-09T13:10:32+5:30
या दौऱ्यासाठी अफगाणीस्तानच्या तालिबानी परराष्ट्रमंत्र्यांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून विशेष परवानगी देण्यात आली आहे.

अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
Afghanistan-India Relation :अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर तालिबानी परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले आहेत. ते सध्या नवी दिल्लीमध्ये असून, भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे, मुत्ताकी यांचे नाव संयुक्त राष्ट्रांच्या (UN) प्रतिबंधित यादीत आहे, परंतु या भारत दौऱ्यासाठी त्यांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून (UNSC) विशेष परवानगी देण्यात आली आहे.
दौऱ्याचे स्वरूप आणि पार्श्वभूमी
मुत्ताकी यांचा हा 8 दिवसांचा भारत दौरा आजपासून सुरू झाला आहे. हा दौरा भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या आमंत्रणावर होत आहे. 2021 मध्ये तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर, भारतात एखाद्या अफगाण मंत्र्याचा हा पहिलाच अधिकृत दौरा आहे. हा दौरा UN सुरक्षा परिषदेच्या मंजुरीनंतरच शक्य झाला आहे. परिषदेने मुत्ताकी यांना प्रवासबंदीवर तात्पुरती सूट दिली आहे, जेणेकरुन ते भारतात येऊ शकतील.
या दौऱ्याचा संभाव्य अजेंडा
रॉयटर्स आणि इतर आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, मुत्ताकी यांचा दौरा अत्यंत व्यस्त असेल. ते फक्त जयशंकर यांच्याच नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, भारतीय उद्योगसंघटना आणि भारतात राहणाऱ्या अफगाण नागरिकांशी देखील भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची भेट होईल का? याची अधिकृत पुष्टी अजून झालेली नाही.
चर्चेचे मुद्दे काय असतील?
व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य: अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील सुका मेवा, मसाले, औषधे आणि आयात-निर्यात याबाबत नव्या शक्यता शोधल्या जातील.
आरोग्य क्षेत्रातील सहयोग: भारत अफगाणिस्तानला वैद्यकीय मदत, औषधे आणि वैद्यकीय प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेऊ शकतो.
व्हिसा आणि कांसुलर सेवा: अफगाण विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना व्हिसामध्ये सवलत देण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
दूतावासांचे पुनर्संचालन: काबूल आणि नवी दिल्लीतील दूतावास पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत दोन्ही देश बोलणी करू शकतात.
नव्या राजदूताची नियुक्ती: तालिबान भारतात आपला अधिकृत प्रतिनिधी राजदूत म्हणून नेमू इच्छितो.
इंफ्रास्ट्रक्चर प्रकल्प: तालिबान भारताला जुन्या विकास प्रकल्पांना पुन्हा सुरू करण्याची आणि नव्या गुंतवणुकींची मागणी करू शकतो.
सुरक्षा हमी: भारत दहशतवादाविरुद्ध ठोस भूमिका आणि सुरक्षा हमी मागण्याची शक्यता आहे.
भारत मान्यता देईल का?
2021 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यानंतर तालिबानने सत्ता काबीज केली होती. त्यानंतर भारताने काबूलमधील आपला दूतावास बंद केला. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये कोणतेही औपचारिक राजनैतिक संबंध नाहीत, तरीदेखील मानवीय मदत आणि काही बॅकडोअर चर्चा सुरू राहिल्या आहेत. सध्या रशिया वगळता कोणत्याही देशाने तालिबानला अधिकृत मान्यता दिलेली नाही. मुत्ताकी यांचा हा दौरा तालिबानच्या आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवण्याच्या प्रयत्नांचा भाग मानला जात आहे. जाणकारांचे मत आहे की, भारत अधिकृत मान्यता देण्यापासून अद्याप सावध राहील.
मुत्ताकीवरील संयुक्त राष्ट्राचे निर्बंध
अमीर खान मुत्ताकी यांना 25 जानेवारी 2001 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिबंध यादीत समाविष्ट करण्यात आले होते. या यादीतील व्यक्तींवर प्रवासबंदी, मालमत्ता गोठवणे आणि शस्त्र खरेदीवरील बंदी यांसारख्या मर्यादा लागू होतात. मात्र, UNSC च्या तालिबान सॅंक्सन कमिटीने त्यांना 9 ते 16 ऑक्टोबर 2025 दरम्यान भारत दौऱ्याची तात्पुरती परवानगी दिली आहे. या समितीचे अध्यक्षपद पाकिस्तानकडे आहे, तर गयाना आणि रशिया उपाध्यक्ष आहेत.
मॉस्को फॉर्मॅट बैठक आणि बगराम विवाद
भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बगराम एअरबेसविषयीच्या योजनेला विरोध दर्शवला होता. या मुद्द्यावर तालिबान, पाकिस्तान, चीन आणि रशियाने भारताचे समर्थन केले आहे. हा विषय नुकत्याच झालेल्या ‘मॉस्को फॉर्मॅट कन्सल्टेशन्स’ बैठकीत चर्चेत आला, ज्यात भारत, अफगाणिस्तान, इराण, कझाकिस्तान, चीन, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझ्बेकिस्तानचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारत दौऱ्यापूर्वी मुत्ताकी यांनी या बैठकीत सहभाग घेतला होता.