हेमंत सोरेन यांच्या अटकेचं प्रकरण आता थेट सुप्रीम कोर्टात; कपिल सिब्बल मैदानात; दिलासा मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 13:10 IST2024-02-01T13:08:57+5:302024-02-01T13:10:45+5:30
कपिल सिब्बल यांनी हेमंत सोरेन यांच्या अटकेविरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

हेमंत सोरेन यांच्या अटकेचं प्रकरण आता थेट सुप्रीम कोर्टात; कपिल सिब्बल मैदानात; दिलासा मिळणार?
Jharkhand Hemant Soren Arrest ( Marathi News ) : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ईडीने अटक करण्यापूर्वीच हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. सोरेन यांच्या अटकेमुळे झारखंडमध्ये राजकीय खळबळ उडाली असून हे प्रकरण कोर्टापर्यंत देखील पोहोचलं आहे. ईडीच्या समन्सविरोधात हेमंत सोरेन यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. तसंच आज या याचिकेवर सुनावणी होणार होती. मात्र ही याचिका मागे घेत ज्येष्ठ वकील आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी हेमंत सोरेन यांच्या अटकेविरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
सोरेन यांच्या अटकेविरोधात कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. आम्ही रांची हायकोर्टातील याचिका मागे घेतली असल्याचं सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात कळवलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात उद्या सोरेन यांना दिलासा मिळणार की ईडीकडून झालेल्या अटकेची कारवाई वैध ठरवली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
झारखंडमध्ये राजकीय संकट
ईडीने कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांच्यावर अखेर अटकेची कारवाई केल्यानंतर सोरेन यांनी राज्यपालांकडे जात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देऊन सोरेन हे घरी पोहोचताच ईडीने त्यांना अटक केली. या सर्व घडामोडींमुळे झारखंडमध्ये राजकीय संकट उभं राहिलं आहे. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर आता झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाकडून ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर चंपाई सोरेन यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. त्यांनी ४३ आमदारांची पाठिंब्याची पत्रेही राज्यपालांना सुपूर्द केली आहेत.