aaj ke shivaji narendra modi book row writer explains comparison of chhatrapati shivaji maharaj and pm narendra modi | ...म्हणून मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली; लेखकानं सांगितलं कारण
...म्हणून मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली; लेखकानं सांगितलं कारण

नवी दिल्ली: भाजपाच्या दिल्लीतल्या कार्यालयातून प्रकाशित करण्यात आलेलं 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' हे पुस्तक अतिशय वादग्रस्त ठरलं आहे. मोदी आणि शिवरायांची तुलना करण्यात आल्यानं सर्वच स्तरातून भाजपावर टीका करण्यात येत आहे. वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांनी त्यांची बाजू मांडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी धाडसी निर्णय घेतात. मोदींचा कारभार शिवरायांसारखा असल्याचं मला वाटतं. त्यामुळेच पुस्तकाला 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' नाव दिल्याचं गोयल म्हणाले. पुस्तक बाजारात आलेलं आहे. मात्र पक्षाचा आदेश माझ्यासाठी अंतिम असेल, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे पुस्तक मागे घेण्याचीदेखील तयारी दर्शवली. 

ब्रह्मांड असेपर्यंत छत्रपतींची बरोबरी कोणीही करू शकणार नाही; अखेर राज्य भाजपानं मौन सोडलं

मोदी पंतप्रधान व्हायच्या आधी देशात दहशतवादी हल्ले व्हायचे. मुंबई, दिल्लीसह देशभरात दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोट घडवले जायचे. अगदी संसदेवर हल्ले करण्यापर्यंत दहशतवाद्यांची मजल गेली होती. मात्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशात एकही मोठा दहशतवादी झालेला नाही, असा दावा गोयल यांनी केला. पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात झालेल्या हल्ल्यांना सर्जिकल स्ट्राइकनं प्रत्युत्तर देण्याची धमक मोदींनी दाखवली. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच मोदींनी आपल्या बांधवांच्या रक्षणासाठी धाडसी निर्णय घेतले, असं गोयल यांनी म्हटलं. 

मोदी आणि शिवरायांची तुलना राज्यातल्या भाजपा नेत्यांना मान्य आहे का?; शिवसेनेचा सवाल

जय भगवान गोयल यांनी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुनही (एनआरसी) मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं. मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी भारत सगळ्यांना धर्मशाळा वाटायचा. मात्र आता तशी परिस्थिती नाही. सीएएमुळे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातल्या अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व मिळणार नाही. तर एनआरसीमुळे घुसखोरांना आळा बसणार आहे, असं गोयल यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचे. मोदी 'सब का साथ, सब का विकास'च्या माध्यमातून तेच करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर स्तुतीसुमनं उधळली. 

'या मंडळींना आवरा'; शिवाजी महाराज- मोदी बरोबरीवरून शिवेंद्रराजेंनी दिली समज

मोदी पंतप्रधान झाल्यापासून जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढली असल्याचं गोयल म्हणाले. मोदी आणि शिवरायांशी तुलना करून कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही. मोदी आणि शिवरायांची कार्यशैली मला सारखीच वाटते. मोदी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच धाडसी निर्णय घेतात, असं म्हणत गोयल यांनी काश्मीरमधून हटवण्यात आलेल्या कलम ३७० चा संदर्भ दिला. यावेळी त्यांना सध्या निर्माण झालेला वाद पाहता पुस्तक मागे घेणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आता पुस्तक तर बाजारात आलेलं आहे. मात्र पक्षाचा निर्णय माझ्यासाठी अंतिम असेल, असं उत्तर दिलं. 

Web Title: aaj ke shivaji narendra modi book row writer explains comparison of chhatrapati shivaji maharaj and pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.