state bjp should clear its stand on aaj ke shivaji narendra modi book says shiv sena mp sanjay raut | मोदी आणि शिवरायांची तुलना राज्यातल्या भाजपा नेत्यांना मान्य आहे का?; शिवसेनेचा सवाल

मोदी आणि शिवरायांची तुलना राज्यातल्या भाजपा नेत्यांना मान्य आहे का?; शिवसेनेचा सवाल

मुंबई: भाजपाच्या कार्यालयात प्रसिद्ध झालेलं 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तक वादात सापडलं आहे. या प्रकरणी भाजपानं माफी मागावी आणि पुस्तक मागे घ्यावं, अशी मागणी होत आहे. वादग्रस्त पुस्तकावरुन काल भाजपाला धारेवर धरणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजही भाजपाला लक्ष्य केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना राज्यातल्या भाजपा नेत्यांना मान्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सर्व मुद्द्यांवर लगेच भूमिका मांडणारे भाजपा नेते शिवराय आणि मोदींच्या तुलनेवर संध्याकाळपर्यंत स्वत:ची भूमिका मांडतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. त्यांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. मात्र भाजपाच्या कार्यालयात प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकात शिवरायांची तुलना मोदींशी करण्यात आलेली आहे. राज्यातल्या भाजपा नेत्यांना हे मान्य आहे का? असल्यास त्यांनी तसं स्पष्ट सांगावं, असं राऊत म्हणाले. भाजपानं लवकरात लवकर वादग्रस्त पुस्तक मागे घ्यावं आणि आमचा या पुस्तकाशी काहीही संबंध नाही, असं जाहीर करावं, असंदेखील राऊत यांनी म्हटलं. 

उद्धवजी, राऊतांच्या जिभेला लगाम घाला; संभाजीराजांचा संतप्त पवित्रा तर राऊतांनी दिलं प्रत्युत्तर

दिल्लीतल्या भाजपा कार्यालयात रविवारी 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तक प्रकाशित होताच संजय राऊत यांनी ट्विटरवरुन भाजपाचा समाचार घेतला. शिवरायांच्या वंशजांनी याबद्दल भूमिका घ्यावी, असं आवाहनदेखील त्यांनी केलं होतं. त्यावरुन राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजेंनी संताप व्यक्त केला. मी माझी भूमिका आधीच जाहीर केलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना लगाम घालावा, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी त्यांचा संताप व्यक्त केला होता. 

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन छत्रपती संभाजीराजे संतप्त; म्हणाले...

संभाजीराजेंनी ट्विटरवरुन व्यक्त केलेल्या संतापावरदेखील संजय राऊत यांनी भाष्य केलं. 'शिवरायांचे सगळे वंशज सध्या भाजपात आहेत. त्यांचा आम्ही सन्मानच करतो. सातारा आणि कोल्हापूरच्या गादीबद्दल आम्हाला आदर आहे. आम्ही सर्वसामान्य असूनही शिवरायांच्या मान-सन्मानासाठी भूमिका घेत आहोत. तसंच आव्हान आम्ही शिवरायांच्या वंशजांना केलं तर त्यात चिडायचं कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. छत्रपतींच्या वंशजांबद्दल मी काहीही चुकीचं बोललेलो नाही. याबद्दल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशीदेखील बोललो आहे, असं राऊत यांनी सांगितलं. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: state bjp should clear its stand on aaj ke shivaji narendra modi book says shiv sena mp sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.