गावोगावी झालेला इंटरनेटचा विस्तार आणि सोशल मीडियाचा प्रसार यामुळे गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडिया स्टार्सचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. ते सोशल मीडिया स्टार्स आपल्या फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी आणि आपल्या व्हिडीओंना व्ह्यूज, लाईक्स आणि शेअर मिळावे यासाठी तऱ्हेतऱ्हेच्या उचापती करत असतात. दरम्यान, इन्स्टाग्रामवरवर फॉलोअर्स मिळवण्याच्या नादात दोन तरुणी थेट तुरुंगात पोहोचल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. पोलिसांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ अपलोड करणाऱ्या महक आणि परी या दोन तरुणींसह त्यांच्या दोन साथीदारांना पकडून त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे.
हे चौघेही आतापर्यंत फरार होते. तसेच संभल येथील पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. सोशल मीडियावर अश्लील कंटेंट प्रसारित केल्याचा आरोप या तरुणींवर होता. तसेच त्यांच्याविरोधात संभलमधील असमोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तरुणींविरोधात ग्रामस्थांकडून सातत्याने तक्रारी दाखल केल्या जात होत्या. महक आणि परी ह्या सख्ख्या बहिणी असून, मागच्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम आणि फेसबूकवरील फॉलोअर्स वाढवण्यासाठी त्या अश्लील व्हिडीओ शेअर करत होत्या.
या दोन्ही बहिणी अश्लील चाळे, शेरेबाजी आणि शिविगाळ करून आपले फॉलोअर्स वाढवत होत्या. त्यांचे चाळे सहन न झाल्याने ग्रामस्थांनी पोलिसांकडे त्यांची तक्रार केली होती. महक आणि परी यांचे इन्स्टाग्रामवर ४.३२ लाख फॉलोअर्स आहेत. तर त्यांनी गेल्या सहा महिन्यात त्यांनी इन्स्टाग्रामवर ५४६ पोस्ट केल्या आहेत. तसेच या दोघीजणी ज्या दहा जणांना फॉलो करत होत्या ते सुद्धा अश्लील कंटेट शेअर करत होते.
या बहिणींचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिल्यानंतर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यासाठी घरी धडक दिली होती. मात्र तेव्हा या तरुणी फरार असल्याचे आढळून आले. अखेरीस त्यांना आता अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या तरुणींनी शेअर केलेले व्हिडीओ आता सोशल मीडियावरून हटवण्यात येत आहेत.