एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 12:00 IST2025-09-22T11:50:21+5:302025-09-22T12:00:53+5:30
दिल्लीतून डिजिटल अरेस्टचे एक प्रकरण समोर आले आहे. एका माजी बँकरला २३ कोटींची फसवणूक करण्यात आली.

एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
दिल्लीतून सायबर फसवणूक आणि डिजिटल अरेस्टची एक घटना समोर आली आहे. माजी बँकर नरेश मल्होत्रा यांची सायबर फसवणूक करण्यात आली. त्यांना एका महिन्यासाठी डिजिटल अरेस्ट करण्यात आली. त्यांच्या बँक खात्यातून २३ कोटी रुपये काढण्यात आले.
सायबर फसवणुकीची सुरुवात एका महिलेच्या कॉलने झाली. पीडितेला टेलिकॉम कंपनीचे कार्यकारी अधिकारी असल्याचे भासवून एक कॉल आला. सुरुवातीला आरोपीने माजी बँकरच्या नावाने एक मोबाइल नंबर असल्याचा दावा केला, या नंबरवरुन बेकायदेशीर कामे केल्याचा आरोप केला. यामुळे माजी बँकर गोंधळून गेला.
काही काळानंतर, वेगवेगळे कॉल आले. यामध्ये सायबर फसवणूक करणाऱ्यांनी स्वतःला मुंबई पोलिस, ईडी आणि सीबीआय अधिकारी म्हणून ओळख करून दिली आणि पीडितेला धमकावले. अनेक हाय प्रोफाइल तपास संस्थांची नावे ऐकून बँकर घाबरला.
पीडितेला ४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर पर्यंत डिजिटल अटकेत ठेवण्यात आले. या दरम्यान त्यांचा मानसिक छळ करण्यात आला. सायबर फसवणूक करणाऱ्यांनी आधी पीडितेवर खोटे आरोप करून धमकावले. त्यानंतर, त्यांच्या कोटक महिंद्रा, एचडीएफसी आणि कॅनरा बँक खात्यांमधील पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले.
सायबर फसवणूक कधी उघडकीस आली?
बँक खाते पूर्णपणे रिकामे झाल्यानंतर, सायबर फसवणूक करणाऱ्यांनी कॉल करणे बंद केले. पीडितेने सुरुवातीला ही बाब कोणालाही सांगितली नाही, पण नंतर ऑनलाइन तक्रार दाखल केली. हे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या सायबर युनिट IFSO कडे सोपवण्यात आले आहे.
पोलिसांनी १२ कोटी रुपये गोठवले
पोलिसांनी बँक खात्यांमधील १२.११ कोटी रुपये गोठवले आहेत. बँकरकडून फसवणूक केलेले पैसे विविध बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आले. नंतर देशभरातील विविध ठिकाणांहून काढले गेले.
डिजिटल अरेस्टपासून कसे वाचाल?
डिजिटल अरेस्टपासून वाचण्यासाठी काही गोष्टीची काळजी घेणे महत्वाचे आहे. जर एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल येत असेल तर कोणी स्वतःला पोलिस, सीबीआय अधिकारी, तपासकर्ता किंवा टेलिकॉम कंपनीचा अधिकारी म्हणून ओळख देत असेल तर घाबरू नका. तुम्ही जर घाबरलात तर ते तुम्हाला डिजिटल अरेस्ट करु शकतात. जर एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल येत असेल तर त्याबद्दल तपशील मागवा. सहसा, सायबर फसवणूक करणारे बेकायदेशीर कामे करणारे किंवा मोबाईल नंबरचा गैरवापर असे खोटे आरोप करतात. जर कोण तुम्हाला फोन कॉल किंवा व्हिडीओ कॉलवर तपासादरम्यान साक्ष देण्यास सांगितले तर काळजी घ्या. सायबर फसवणूक करणारे पोलिसांचा गणवेश घालून स्वतःला पोलिस म्हणून ओळख देऊ शकतात, हे बनावट असतात. या लोकांना तुम्ही घाबरू नका.