"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 20:19 IST2025-07-24T20:18:14+5:302025-07-24T20:19:28+5:30

...पण मराठे स्वतःसाठी लढत नव्हते. तर स्वराज्यासाठी, या देशासाठी, देव, देश आणि धर्मासाठी लढत होते. त्यांनी तो प्रस्ताव झुगारला आणि सांगितले की एक इंच जमीनही तुम्हाला देणार नाही. या देशाची एक एक इंच जमीन आमची आहे...

A Marathi man fighting for the country cannot be narrow-minded, some are allergic to the name of Shivaji maharaj Chief Minister Fadnavis powerful speech in Delhi JNU | "देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण

"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या दोन्ही केंद्रांचे उद्घाटन आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी पानिपतच्या लढाईचे उदाहरण देत, मराठ्यांच्या इतिहासावर भाष्य केले. तसेच, देशासाठी लढणारा मराठी माणूस संकुचित विचार करू शकत नाही, असे म्हणत, काही लोकांना छत्रपती शिवरायांच्या नावाची ॲलर्जी आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

फडणवीस म्हणाले, "आपल्याला माहीत आहे, पानीपतची लढाई ही मराठ्यांची लढाई नव्हती. मराठ्यांनी तीतून अंग काढले असते तर कोणीही काही म्हटले नसते. पानीपतच्या लढाईसाठी या ठिकाणचा बादशहा मराठ्यांना म्हणाला होता, अहमदशाहा अब्दाली आला आहे, त्याला आम्ही रोखू शकत नाही, तुम्ही त्याला रोखण्याचा प्रयत्न करा. आणि मराठ्यांनी ते शिवधनुष्य पेलायचं ठरवलं आणि त्याला (अहमदशहा अब्दालीला) यमुनेपार नेलं."

पानिपतच्या लढ्यासंदर्भात पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, "यमुनेपार जाऊन अहमदशाहा अब्दालीने मराठ्यांना पत्र लिहिले की मला तुमच्याशी तह करायचा आहे. आणि काय तह करायचा, तर तुम्ही तेव्हाचा संपूर्ण पंजाब जो पाकिस्तानसह होता, सिंध आणि बलुचिस्तान हे तीन प्रांत माझे आहेत, हे मान्य करा. उरलेला संपूर्ण भारत मराठ्यांचा आहे हे मी मान्य करतो. असे पत्र त्याने लिहिले होते. पण मराठे स्वतःसाठी लढत नव्हते. तर स्वराज्यासाठी, या देशासाठी, देव, देश आणि धर्मासाठी लढत होते. त्यांनी तो प्रस्ताव झुगारला आणि सांगितले की एक इंच जमीनही तुम्हाला देणार नाही. या देशाची एक एक इंच जमीन आणची आहे. भारतीय संस्कृतीची आहे, ही आमच्या भगव्या झेंड्याखालील आमची संस्कृती आहे, या संस्कृतीचे पाईक बनून आम्ही येथे काम करू आणि पानीपत लढण्यासाठी मराठे तिथे गेले." 

फडणवीस पुढे म्हणाले, "खरे आहे, पानीपतच्या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले, पण दहा वर्षांत शिंद्यांनी दिल्लीवर पुन्हा मराठ्यांचा ध्वज फडकवला आणि दिल्ली जिंकून दाखवली. हा आपला इतिहास आहे. म्हणूनच देशासाठी लढणारा मराठी माणूस संकुचित विचार करू शकत नाही, छोटा विचार करू शकत नाही. मला वाटते आज ही आनंदाची गोष्ट आहे की, ज्या राजधानीला वाचवण्यासाठी अनेक वेळा मराठ्यांनी बलिदान दिले, त्या देशाच्या राजधानीत आज हे मराठी अध्यासन होत आहे आणि तेही कुसुमाग्रजांच्या नावाने होत आहे. ही त्यापेक्षाही अतिशय आनंदाची गोष्ट आहे."

काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी-
फडणवीस पुढे म्हणाले, "कुलगुरू महोदया, मी आपले मनापासून आभार मानतो आणि आपण काळजी करू नका. आम्हाला इथली आताची शांती माहित आहे, आधीची शांतीही माहित आहे. पण 'शांतीजी' आल्यापासून जी शांती तयार झाली आहे, ती आम्ही निश्चितपणे पाहिली आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. काही लोकांना छत्रपती शिवरायांच्या नावाची ॲलर्जी आहे, पण अशी लोकं बोटावर मोजण्याइतकी आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. हा देश कालही शिवरायांच्या नावाने ओळखला गेला, आजही शिवरायांच्या नावाने ओळखला जातो आणि उद्याही शिवरायांच्या नावानेच ओळखला जाईल. कोणी कितीही त्याला विरोध केला तरीही. या ठिकाणी छत्रपती शिवराय हे खऱ्या अर्थानं आमच्या स्वराज्याचे जनक होते आणि म्हणून ते आमचे दैवत राहतीलच." 

Web Title: A Marathi man fighting for the country cannot be narrow-minded, some are allergic to the name of Shivaji maharaj Chief Minister Fadnavis powerful speech in Delhi JNU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.