पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही, असं म्हणतात. पहिल्या प्रेमासाठी लोक वाटेल ते करायला तयार असतात. असाच एक धक्कादायक प्रकार बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात घडला आहे. ५० वर्षांची एक महिला डॉक्टर तिच्या वकील असलेल्या ६० वर्षीय माजी प्रियकरासोबत घर सोडून पळून गेली. विशेष म्हणजे दोघंही एकेकाळी प्रेमसंबंधात होते आणि अनेक वर्षांनी पुन्हा भेटल्यानंतर त्यांच्यातील जुनं नातं पुन्हा फुललं. मात्र, ही प्रेमकथा त्याच्या पलीकडे गेली आणि कायदेशीर प्रकरणात अडकली.
महिला डॉक्टर आणि वकील यांचं प्रेम त्यांच्या तरुणपणात सुरू झालं होतं. त्यावेळी दोघंही दिल्लीत शिक्षण घेत होते. मात्र, कुटुंबांचा विरोध झाल्याने त्यांचं नातं फळलं नाही. दोघांचं लग्न वेगवेगळ्या ठिकाणी ठरलं. महिला डॉक्टरने दुसऱ्या डॉक्टरशी लग्न केलं, तर वकीलही आपल्या वैवाहिक जीवनात स्थिर झाला. दोघांचं सांसारिक जीवन सुरळीत चालू होतं आणि त्यांना मुलेही झाली.
एक अचानक भेट आणि प्रेम पुन्हा जागलं!अनेक वर्षांनंतर दोघांची अचानक भेट झाली आणि जुनं प्रेम पुन्हा उफाळून आलं. मैत्री म्हणून सुरू झालेलं बोलणं, हळूहळू नव्या नात्यात परावर्तित झालं. मात्र, जेव्हा महिला डॉक्टरच्या नवऱ्याला याची माहिती मिळाली, तेव्हा त्याने वकिलाला धमकावत घरापासून दूर राहण्यास सांगितलं.
गुपचूप भेट आणि पळून जाण्याची योजनानवऱ्याने धमकावल्यानंतरही महिला डॉक्टर आणि वकील यांच्यातील नाते संपले नाही. वकिलाचे तिच्या घरी जाणे सुरूच राहिले. गेल्या आठवड्यात जेव्हा तिचा पती क्लिनिकला गेला, तेव्हा डॉक्टर पत्नी आपल्या माजी प्रियकरासोबत घरातून निघून गेली. हे समजताच कुटुंबातील सदस्य आणि परिसरात एकच खळबळ उडाली.
२४ तासांत पोलिसांनी दोघांना शोधले!महिला डॉक्टरच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. हे प्रकरण उच्चप्रोफाईल असल्याने पोलीस त्वरित कामाला लागले. दोघांचे मोबाईल नंबर ट्रॅक करून केवळ २४ तासांत सहरसा येथून दोघांना शोधून काढण्यात आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर कुटुंबीयांमध्ये चर्चेअंती एक करारनामा करण्यात आला.
डॉक्टर पतीने माध्यमांना सांगितले की, त्याच्या पत्नीच्या वागणुकीमुळे समाजात त्याची प्रतिष्ठा ढासळली आहे. त्यांच्या दोन मुलांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं असून, मुलगी स्पर्धा परीक्षेच्या तयारीत आहे. ही घटना त्यांच्या मुलांवरही मानसिक परिणाम घडवणारी ठरली आहे. ही प्रेमकहाणी सध्या पूर्णिया आणि आजूबाजूच्या परिसरात मोठा चर्चेचा विषय बनली आहे.