कार्यालयातून घरी जात असताना भाजपा नेत्यावर गोळीबार; भररस्त्यात मृत्यू, बिहारमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 13:11 IST2023-09-19T13:11:23+5:302023-09-19T13:11:38+5:30
रात्रीच्या वेळी भररस्त्यात भाजपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

कार्यालयातून घरी जात असताना भाजपा नेत्यावर गोळीबार; भररस्त्यात मृत्यू, बिहारमधील धक्कादायक घटना
नवी दिल्ली : रात्रीच्या वेळी भररस्त्यात भाजपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बिहारमधील या धक्कादायक घटनेने अनेकांचे लक्ष वेधले. बिहारमधील सिवानमध्ये भाजपा नेत्याच्या हत्येने स्थानिक राजकारण तापल्याचे दिसते. रात्री कार्यालयातून घरी परतत असताना भाजपा नेत्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा एक नातेवाईकही जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबाराजा मोठा आवाज ऐकताच स्थानिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पण, दुर्दैवाने भाजपा जिल्हाध्यक्षाचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भाजपाचे प्रभाग अध्यक्ष शिवाजी तिवारी हे कार्यालयातून घरी परतत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मेहुणा देखील दुचाकीवर बसला होता. अशातच भररस्त्यात दुचाकीवरून काही हल्लेखोर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. एक गोळी मृत नेत्याच्या मेहुण्याला लागली असून तो गंभीर जखमी आहे.
भाजपा नेत्यावर गोळीबार
दरम्यान, हत्येच्या या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. सिवानचे पोलीस अधिखारी फिरोज आलम आणि निरीक्षक सुदर्शन रामही घटनास्थळी पोहोचले. लक्षणीय बाब म्हणजे मृत भाजपा नेत्याच्या घरात याआधी ऑगस्टपासून तीन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंब आधीच असह्य होते.
भररस्त्यात मृत्यू
आपल्या सहकाऱ्याच्या हत्येनंतर स्थानिक भाजपा नेत्यांनी शोक व्यक्त केला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय पांडे यांनी शिवाजी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. "शिवाजी हे भाजपाचे अत्यंत सक्रिय कार्यकर्ते होते", अशा प्रतिक्रिया भाजपा नेते देत आहेत. या हत्याकांडानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. अज्ञात मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांना पकडण्यासाठी पोलीस शहरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.