इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 16:52 IST2025-07-04T16:52:37+5:302025-07-04T16:52:59+5:30
crime news : आसामच्या कछारमधील एका खासगी हॉस्पिटलमधील हा प्रकार आहे. मीडिया रिपोर्टनुसार मणिपूरच्या जिरीबाममध्ये राहणारा अतीकुर्रहमान नावाच्या तरुणाबाबत हा प्रकार घडला आहे.

इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
जांघेमध्ये व प्रायव्हेट पार्टच्या जागी संसर्ग झाला म्हणून एक २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे उपचारासाठी गेला होता. परंतू, डॉक्टरने उपचार करताना तरुणाचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला आहे. प्रकरण अंगाशी येताच डॉक्टर पसार झाला आहे. मणिपूरच्या रुग्णासोबत आसाममध्ये ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
आसामच्या कछारमधील एका खासगी हॉस्पिटलमधील हा प्रकार आहे. मीडिया रिपोर्टनुसार मणिपूरच्या जिरीबाममध्ये राहणारा अतीकुर्रहमान नावाच्या तरुणाबाबत हा प्रकार घडला आहे. डॉक्टरांनी उपचाराच्या नावाखाली आपल्याला न विचारता प्रायव्हेट पार्टच कापल्याचा त्याने आरोप केला आहे.
अतीकुर्रहमान हा १९ जूनला संसर्गाची तक्रार घेऊन डॉक्टरकडे गेला होता. डॉक्टरांनी तपासून त्याला बायोप्सी टेस्ट करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर या तरुणाने डॉक्टरांना टेस्ट करण्याची परवानगी दिली होती, यानुसार त्याच्या टेस्ट सुरु होत्या. यावेळी तो बेशुद्ध झाला होता. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा आपला प्रायव्हेट पार्टच गायब असल्याचे त्याला समजले. डॉक्टरांनी तो काढून टाकला होता.
यामुळे हादरलेल्या अतीकने हॉस्पिटलमधील नर्सना विचारणा केली. त्याला केवळ बायोप्सी टेस्ट करण्याचे सांगण्यात आले होते. डॉक्टरांना या ऑपरेशनबाबत विचारले तर त्यांनी योग्य उत्तर दिले नाही. आता तर हा डॉक्टरच फरार झाला आहे, फोनही उचलत नाहीय. यामुळे अतीकने पोलिसांत धाव घेतली आहे. तसेच आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनाही या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
डॉक्टरांनी असा प्रकार केल्याने माझे आयुष्य बरबाद झाले आहे. मानसिक स्थिती देखील खराब झाली आहे. डॉक्टर काही उत्तर देत नाही की हॉस्पिटल. मला समजत नाहीय की मी काय करू, असे अतीकने म्हटले आहे. पोलीसही या प्रकरणाची चौकशी करत असून फरारी डॉक्टरचा देखील शोध घेतला जात आहे.