"अंकल-आंटी माफ करा, पप्पांची काळजी घ्या", 7वीच्या विद्यार्थ्याने सुसाइड नोट लिहून संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 18:24 IST2022-09-23T18:24:02+5:302022-09-23T18:24:13+5:30
उत्तर प्रदेशातील रायबरेमधील इयत्ता सातवीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.

"अंकल-आंटी माफ करा, पप्पांची काळजी घ्या", 7वीच्या विद्यार्थ्याने सुसाइड नोट लिहून संपवलं जीवन
रायबरेली : उत्तर प्रदेशातील रायबरेमधील इयत्ता सातवीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. एक भावनिक सुसाइट नोट लिहून विद्यार्थ्याने जीवन संपवले आहे. खरं तर विद्यार्थ्याने लिहलेल्या अखेरच्या काही शब्दांमुळे अनेकांना भावूक केले आहे. घटनास्थळी पोहचलेल्या सीओ वंदना सिंग यांनी म्हटले, "मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सर्व स्तरावरून अधिक तपास केला जात आहे. दोषींविरोधात कडक कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय दिला जाईल."
दरम्यान, विद्यार्थी यश मौर्य 5 वर्षांपासून आई-वडीलांपासून दूर काका-काकीसोबत राहून शिक्षण घेत होता. गुरूवारी त्याची परीक्षा होती. यामध्ये त्याला कॉपी करताना पकडले होते. यावरून शिक्षकांनी त्याला सर्वप्रथम वर्गातच शिक्षा दिली. नंतर त्याला प्राध्यापकांकडे नेण्यात आले. शिक्षकांचा छळ सहन न झाल्याने त्याने मृत्यूला कवटाळल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तो मूळचा रायबरेलीतील बछरावन येथील सेहांगो गावाचा रहिवासी होता.
एक संधी द्यायला हवी होती
विद्यार्थ्याने सुसाइट नोटमध्ये लिहले, "अंकल-आंटी मला माफ करा. पप्पांची काळजी घ्या. चूक झाल्यावर एक संधी जरूर द्यायला हवी. मी माझ्या चुकीमुळे रडत आहे. मला माझ्या शाळेतील मित्रांमध्ये खूप लाज वाटते. सगळे जण शेम-शेम बोलत होते. मला आता हे आणखी सहन होत नाही." विद्यार्थ्याचे अखेरचे शब्द वाचून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. याप्रकरणी शाळेवर कारवाई करून आम्हाला न्याय मिळावा, असे जवाहर विहार कॉलनीतील रहिवासी आणि मृत विद्यार्थ्याचे काका यांनी म्हटले.
"बसमध्ये डोकं खाली घालून बसला होता दादा"
भावाच्या मृत्यूनंतर शाळेत शिक्षण घेत असलेल्या यशच्या लहान बहीणीला अश्रू अनावर झाले. "शाळा सुटल्यावर दादा बसमध्ये डोकं खाली टेकवून बसला होता. घरी आल्यावर तो सरळ त्याच्या रूममध्ये गेला. यानंतर पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. "