७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 20:23 IST2025-11-24T20:22:23+5:302025-11-24T20:23:04+5:30
Lucknow Vande Bharat Express Train: वंदे भारत ट्रेन नव्या मार्गावरून चालवली जाणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे न घडल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी असल्याचे म्हटले जात आहे.

७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
Lucknow Vande Bharat Express Train: आताच्या घडीला भारतीय रेल्वेची वंदे भारत ट्रेन सर्वाधिक लोकप्रिय असून, सुमारे १६० वंदे भारत ट्रेन देशभरात सेवा देत आहेत. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही मार्गांवरील वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करण्यात आले. परंतु, यातील एका वंदे भारत ट्रेनच्या मार्गाबाबत आता प्रवाशांमध्ये नाराजी पसरल्याचे म्हटले जात आहे.
लखनऊ विभागातील ऐशबाग ते दिल्ली मार्गे पिलीभीत हा एक नवीन मार्ग विकसित करण्यात आला आहे, परंतु त्याऐवजी, जुन्या मार्गावरूनच अजून विशेष आणि प्रिमियम ट्रेन सुरू आहेत. यामुळे लखीमपूर, गोला, पिलीभीत, मैलानी आणि इतर भागातील प्रवाशांना जलद आणि प्रिमियम सेवांचा लाभ घेता येत नाही. अलीकडेच सुरू झालेली सहारनपूर वंदे भारत एक्सप्रेस जुन्या मार्गावर चालवली जात आहे. नवीन मार्गावर फक्त गोरखपूर-मैलानी एक्सप्रेस आणि प्रवासी ट्रेन धावत आहेत.
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच
लखनऊ विभागातील ऐशबाग-पिलीभीत विभाग मीटरगेज होता, परंतु रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) ने २०१६ मध्ये त्याचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यास सुरुवात केली. ब्रॉडगेज आणि विद्युतीकरणावर सुमारे ₹७०० कोटी खर्च झाले, परंतु या मार्गावर अद्याप जलद, प्रिमियम ट्रेन सुरू करण्यात आलेल्या नाहीत. लखनऊ जंक्शन ते सहारनपूर अशी नुकतीच सुरू झालेली वंदे भारत ट्रेन आता सीतापूर आणि बरेली मार्गे सहारनपूरकडे जाते. त्याऐवजी, ती या नवीन अत्याधुनिक मार्गावर चालवायला हवी होती, अशी मागणी केली जात आहे. यामुळे सीतापूरहून लखीमपूर, गोला, मैलानी आणि पिलीभीत मार्गे ट्रेन प्रवास करू शकली असती, ज्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असता. परंतु, असे झाले नाही.
व्हीआपी ट्रेनसाठी प्रवाशांना लखनऊ गाठावे लागते
ऐशबाग-पिलीभीत मार्गे दिल्लीला जाणाऱ्या नव्याने सुरू झालेल्या मार्गावर शताब्दी एक्सप्रेस आणि डबल-डेकर या व्हीआयपी ट्रेन चालवण्याची योजना आखण्यात आली होती. परंतु, ही बाब अद्याप प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही. परिणामी, मार्गावरील स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अजूनही व्हीआयपी ट्रेनसाठी लखनऊला जावे लागते.
दरम्यान, सहारनपूर वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी केले होते. परंतु दोन आठवडे उलटूनही ती अद्याप वेळापत्रकानुसार चालत नसल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनचे वेळापत्रक बदलले जात आहे. ज्यामुळे वंदे भारत ट्रेनला सातत्याने उशीर होत आहे. सुरुवातीला लखनऊहून सकाळी निघणारी ही ट्रेन आता सकाळी सहारनपूरहून निघणार असल्याचे सांगितले जात आहे.