यमुना एक्स्प्रेस-वे भीषण दुर्घटना, सात जणांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 14:49 IST2019-02-19T14:17:51+5:302019-02-19T14:49:10+5:30
उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. बलदेव परिसरात अॅम्ब्युलन्स आणि कारची जोरदार टक्कर झाली. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला.

यमुना एक्स्प्रेस-वे भीषण दुर्घटना, सात जणांचा जागीच मृत्यू
मथुरा - उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. बलदेव परिसरात अॅम्ब्युलन्स आणि कारची जोरदार टक्कर झाली. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक आदित्य शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त अॅम्ब्युलन्स जम्मूहून मृतदेह घेऊन पाटण्याच्या दिशेनं जात होती. यावेळेस यमुना एक्स्प्रेस-वेवर बलदेव परिसरात अॅम्ब्युलन्स दुभाजकावर आदळली आणि उलटली. याचवेळेस आग्र्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या कारनं अॅम्ब्युलन्सला टक्कर दिली. या दुर्घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य करण्यास सुरुवात केली. अपघातग्रस्त वाहनांमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे कार्य सुरू आहे.