जेएनयूच्या ६ विद्यार्थ्यांवर पोलिसांशी चकमकीमुळे गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 10:31 IST2025-10-21T10:30:34+5:302025-10-21T10:31:05+5:30
शांतता राखण्यासाठीच्या बॉण्डवर सह्या घेतल्या, ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीनंतर दिले साेडून

जेएनयूच्या ६ विद्यार्थ्यांवर पोलिसांशी चकमकीमुळे गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी सोमवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) सहा विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामध्ये विद्यार्थी संघटनेच्या तीन पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीच्या एक दिवसानंतर ही घडामोड घडली.
वसंत कुंज (उत्तर) पोलिस ठाण्याकडे निघालेल्या निषेध मोर्चादरम्यान विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला होता. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नितीश कुमार, उपाध्यक्ष मनीषा, सरचिटणीस मुंतेहा फातिमा आणि विद्यार्थी मणिकांत पटेल, ब्रिटी कर आणि सौर्य मजुमदार यांना शांतता राखण्यासाठीच्या बाँडवर स्वाक्षरी करायला लावण्यात आली.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कायदेशीररीत्या बोलावले असता विद्यार्थ्यांना तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे लागेल आणि ते शहर सोडण्याचा विचार करत असतील तर त्यांना पोलिसांना आगाऊ माहिती द्यावी लागेल. त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, दिल्ली पोलिस कायद्याच्या कलम ६५ अंतर्गत २८ इतर विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आणि नंतर वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना सोडून देण्यात आले.
पोलिसांची कारवाई राजकीय हेतूने
जेएनयू शिक्षक संघटनेने पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आणि ती राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले आहे. तसेच सायंकाळी ७ नंतर विद्यार्थिनींना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि प्रशासनाला विद्यापीठाच्या लोकशाही विद्यार्थी राजकारणाच्या परंपरेचे रक्षण करण्याचे आवाहन केले. तथापि, पोलिसांनी आरोप फेटाळून लावले आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि तणाव वाढू नये म्हणून कारवाई आवश्यक होती, असे म्हटले आहे.
विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स तोडून वाहतूक ठप्प केली
नेल्सन मंडेला मार्गावर विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स तोडल्याच्या व वाहतूक विस्कळीत केली. यात सहा पोलिस जखमी झाले. एआयसा आणि एसएफआयसह डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी आयोजित केलेला हा निषेध मोर्चा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची मागणी करण्यासाठी होता. कॅम्पसमध्ये अलीकडेच झालेल्या जाहीर सभेत डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांवर संघ समर्थित गटाने हल्ला केल्याचा आरोप केला. विद्यार्थी संघटनांनी आरोप केला की, पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी क्रूर हल्ला केला.