२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 06:33 IST2025-08-26T06:32:53+5:302025-08-26T06:33:39+5:30
National Highway News: रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले असतानाही राष्ट्रीय महामार्गांवर टोलवसुली सुरू असल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) नुकतेच फटकारले आहे.

२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
नवी दिल्ली - रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले असतानाही राष्ट्रीय महामार्गांवर टोलवसुली सुरू असल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) नुकतेच फटकारले आहे. गेल्या पाच वर्षांत झालेले अपघात आणि टोल नाक्यांवरील वादामुळे चिंता निर्माण झाली असून, यावर कोर्टाने कारवाईची मागणी
केली आहे.
अर्थ मंत्रालय आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या २०२०-२४ च्या अपघात आणि नुकसानीवरील अहवालानुसार, पाच वर्षांत देशातील राष्ट्रीय महामार्गांवर २.५ लाख अपघात झाले. यात ८०,००० लोकांचा मृत्यू झाला आणि २.३ लाख लोक जखमी झाले. २०२४ मध्ये, ४८,००० अपघातांमध्ये १७,२०० मृत्यूंची नोंद झाली. २०२४-२५ या आर्थिक वर्षात, भारतातील राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुलीतून सुमारे ८५,००० कोटी रुपये कमावले गेले. तरीही देशातील १.४६ लाख किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांपैकी २०% (२९,२०० किमी) राष्ट्रीय महामार्ग ८०-१०० किमी/ताशी वेगाने प्रवास करण्यासाठी असुरक्षित आहेत आणि तेही विशेषतः खराब रस्ते आणि अरुंद वळणांमुळे.
टोल नाक्यांवर हाणामारी
२०२०-२४ मध्ये, राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यावर ४,५०० मारहाणीच्या घटना घडल्या. यात उत्तर प्रदेश (१,२००), राजस्थान (९००) आणि हरयाणा (८००) यांचा
समावेश आहे.
एकूण ४,५०० प्रकरणांपैकी फक्त १,८०० प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आणि १,२०० लोकांवर कारवाई (दंड किंवा अटक) करण्यात आली, असे अहवालात स्पष्ट होते.
अपघातांची कारणे
रस्ते वाहतूक मंत्रालय आणि आयआयटी दिल्ली यांनी २०२४ मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, ७५.२% अपघात अतिवेगाने, २.५% दारू पिऊन गाडी चालवल्याने आणि १०% तांत्रिक बिघाडांमुळे (खड्डे, खराब सिग्नल, तुटलेले डिव्हायडर) झाले आहेत.
२.५ लाख अपघात गेल्या ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर झाले. यात ८० हजार मृत्यू, २.३ लाख जण गंभीर जखमी झाले.