२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 19:54 IST2026-01-08T19:53:12+5:302026-01-08T19:54:22+5:30
महसूल गुप्तचर संचालनालयाने मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे सोने आणि रोख रक्कम जप्त केली. सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा डीआरआयने पर्दाफाश केला.

२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
दुबई आणि बांगलादेशातून चालवल्या जाणाऱ्या तस्करी रॅकेटला केंद्रीय यंत्रणेने दणका दिला. महसूल गुप्तचर संचालनालय (Directorate of Revenue Intelligence) या तपास यंत्रणेने दिल्ली आणि आगरातळा येथे एकाच वेळी धाडी टाकत मोठ्या प्रमाणात सोने आणि रोख रक्कम जप्त केली.
महसूल गुप्तचर संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन शहरात टाकण्यात आलेल्या या धाडीमध्ये २९ किलो सोने जप्त करण्यात आले. त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ४० कोटी रुपये इतकी आहे. तर रोख रक्कमही मिळाली असून, ती २.९० कोटी रुपये इतकी आहे.
डीआरआयने आगरातळा येथे केलेल्या या कारवाईमध्ये आसाम रायफल्स जवानांचाही सहभाग होता. डीआरआयला गुप्तचर यंत्रणेकडून आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर बुधवारी धाडी टाकण्यात आल्या.
दुबई आणि बांगलादेशातून चालवल्या जात असलेल्या या तस्करी रॅकेटचे मोठे जाळे आहे. ६ जानेवारी रोजी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी या रॅकेटमधील स्थानिक गोडाऊनमधून चार जणांना बेड्या ठोकल्या. आगरातळा येथून १५ किलो सोने जप्त करण्यात आले, ज्याची अंदाजे किंमत २०७३ कोटी रुपये इतकी आहे.
डीआरआयच्या पथकाने दिल्लीतही कारवाई केली. दिल्लीत अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. १४.२ किलो परदेशातून आणण्यात आलेले सोने जप्त करण्यात आले. त्याचबरोबर २.९० कोटी रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली. रोख रक्कम भारतीय आणि बांगलादेशी चलनात आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.