"तू ओवर ॲक्टिंग करतोय"; शिक्षिकेने वर्गात केला अपमान; सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रो स्टेशनवरुन मारली उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 12:20 IST2025-11-20T11:05:49+5:302025-11-20T12:20:22+5:30
दिल्लीतल्या शाळेत शिक्षकांच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने वातावरण तापलं आहे

"तू ओवर ॲक्टिंग करतोय"; शिक्षिकेने वर्गात केला अपमान; सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रो स्टेशनवरुन मारली उडी
Delhi Student Death:सांगलीच्या खानापूर तालुक्यातील ढवलश्वर गावचा रहिवासी असलेल्या शौर्य प्रदीप पाटील (१६) या १० वीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीच्या राजेंद्र प्लेस मेट्रो स्टेशनवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने दिल्ली आणि महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. शौर्यने त्याच्या शाळेतील शिक्षकांनी केलेल्या मानसिक छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप
शौर्यच्या मृत्यूनंतर दिल्लीमध्ये त्याला न्याय मिळवून देण्यासाठी कॅन्डल मार्च काढले जात असून, शाळा प्रशासनाविरुद्ध तीव्र विरोध प्रदर्शन सुरू आहे. मंगळवारी ही हृदयद्रावक घटना घडली. पोलीस तपासणीत शौर्यच्या बॅगेत दीड पानाची सुसाइड नोट सापडली, जी या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. सुसाइड नोटमध्ये शौर्यने स्पष्ट लिहिले की, "स्कूल वालों ने इतना बोला कि मुझे यह करना पड़ा... स्कूल की टीचर है ही ऐसी, क्या बोलूं…" त्याने थेट शाळेच्या मुख्याध्यापिका आणि तीन शिक्षिकांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
शौर्यने त्याची शेवटची इच्छा म्हणून, मुख्याध्यापिका अपराजिता पाल आणि शिक्षिका मन्नू कालरा, युक्ती महाजन आणि जूली वर्गीस यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून दुसऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यासोबत असे घडू नये. त्याने आपल्या आई-वडिलांची आणि भावाची माफी मागितली आहे. तसेच, "जर माझ्या शरीराचा कोणताही भाग काम करत असेल, तर कृपया गरजू व्यक्तीला दान करा अशीही इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
'परीक्षा जवळ म्हणून शाळा बदलली नाही'
शौर्यचे वडील सध्या महाराष्ट्रातून दिल्लीत परतले आहेत. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा महिनोन् महिने शिक्षकांच्या वागणुकीमुळे त्रस्त होता. "तो आम्हाला सतत सांगायचा की शिक्षिका त्याला प्रत्येक छोट्या गोष्टीवरून ओरडतात आणि मानसिक त्रास देतात. आम्ही अनेकदा तोंडी तक्रार केली, पण त्यांनी ऐकले नाही. दहावीच्या परीक्षा दोन महिन्यांवर आल्या होत्या आणि २० गुण शाळेकडून मिळतात, त्यामुळे कोणताही वाद नको म्हणून त्यांनी शाळा बदलणे टाळले. मुलाला आश्वासन दिले होते की, परीक्षा संपल्यावर दुसऱ्या शाळेत प्रवेश घेऊ, असे शौर्यच्या वडिलांनी सांगितले.
मृत शौर्यच्या मित्रांनी त्याच्या वडिलांना सांगितले की, गेल्या चार दिवसांपासून एक शिक्षक त्याला धमकावत होता आणि त्याच्या पालकांना टीसीसाठी बोलावण्याची मागणी करत होता. शिवाय, एका शिक्षिकेने विद्यार्थ्याला धक्काबुक्कीही केली होती. मंगळवारी, जेव्हा शौर्य नाटकाच्या वर्गात पडला तेव्हा तिने त्याला सर्वांसमोर अपमानित केले आणि तो ओवर ॲक्टिंग करत असल्याचे म्हटले. शिक्षिकेने त्याला इतके फटकारले की तो रडू लागला. यावेळी मुख्याध्यापक देखील उपस्थित होते, परंतु तिने काहीही सांगितले नाही.
५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी शौर्यच्या सुसाइड नोटमध्ये केलेल्या आरोपांच्या आधारावर सेंट कोलंबस स्कूलच्या मुख्याध्यापिका अपराजिता पाल आणि तीन शिक्षिकांसह पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०७ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. सध्या राजा गार्डन मेट्रो पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
शौर्य पाटीलची हृदय पिळवटून टाकणारी सुसाइड नोट
आत्महत्या करण्यापूर्वी शौर्य पाटील या दहावीच्या विद्यार्थ्याने दीड पानाची सुसाइड नोट लिहिली होती. शाळेतील शिक्षकांच्या छळामुळे आयुष्याचा शेवट करणाऱ्या शौर्यने, या नोटमधून आपल्या भावनांना आणि मागण्यांना वाट मोकळी करून दिली आहे.
"जो कोणी हे वाचत असेल, माझे नाव शौर्य पाटील आहे. कृपया या ९९११५९XXXX नंबरवर कॉल करा. मी हे केले याचा मला खूप दुःख आहे). शाळेतील लोकांनी मला इतके बोलले की, मला हे करावे लागले. माझ्या शरीराचा कोणताही अवयव जर उपयोगी असेल किंवा काम करण्याच्या स्थितीत राहिला असेल, तर कृपया तो ज्याला खरोखर गरज आहे, अशा व्यक्तीला दान करा. माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी खूप काही केले, आय एम सॉरी, मी त्यांना काहीच देऊ शकलो नाही. सॉरी भैया मी खूप उद्धट होतो. सॉरी मम्मी, मी तुमचे मन खूप वेळा दुखावले. आता शेवटच्या वेळी तुमचा विश्वास तोडत आहे. शाळेचे शिक्षक असे आहेत की, काय बोलू! युक्ती मॅम, पाल मॅम, मनू कालरा मॅम. माझी अंतिम इच्छा आहे की, या सगळ्यांवर कठोर कारवाई केली जावी. माझ्यासारखे दुसरे कोणतेही मूल असे काही करू नये, अशी माझी इच्छा आहे. आता कृपया यापुढे वाचू नका. हा भाग फक्त माझ्या कुटुंबातील सदस्यांसाठी आहे. सॉरी भैया, मी तुला शिवीगाळ केली, तुझ्याशी वाद घातला. मोठ्या भावाचा जो आदर करायला हवा होता, तो मी केला नाही. व्हेरी सॉरी पापा, तुम्ही मला वेप साठी कधीही माफ करणार नाही आणि करायलाही नको. मी तुमच्यासारखा एक चांगला माणूस बनायला हवे होते. मम्मी, तूच आहेस जिने मला नेहमी पाठिंबा दिला. जसा पार्थ भैयाला आणि बाबांनाही (तुम्ही) करता. मला खेद आहे, पण सेंट कोलंबसच्या शिक्षकांनी हे माझ्यासोबत केले आहे."