मागितलेलं सगळं मिळेल असं नाही; नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या गदारोळावर भुजबळांनी मांडली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 09:44 IST2025-01-21T09:32:08+5:302025-01-21T09:44:34+5:30
राष्ट्रवादीचे नेते आणि नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीतील वादंगावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मागितलेलं सगळं मिळेल असं नाही; नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या गदारोळावर भुजबळांनी मांडली भूमिका
NCP Chhagan Bhujbal : पालकमंत्रिपदावरून महायुतीत सुरू असलेला वाद अजूनही थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. कारण नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती देण्याची नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओढावली आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या दादा भुसे यांच्या नावाची असलेली चर्चा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्ह्यातील वर्चस्व यामुळे दोन्ही पक्षांनी त्यावर हरकत घेतल्याने भाजपच्या वाटेला आलेले पालकमंत्रिपद स्थगित करण्यात आल्याची चर्चा जिल्ह्यात पसरली. या सर्व वादंगावर राष्ट्रवादीचे नेते आणि नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली आहे.
"मी मंत्रिमंडळात नाही. त्यामुळे पालकमंत्रिपदाबाबत काय चाललंय, कोण काय मागतं मला माहीत नाही. मागितलेलं सगळे मिळेल असे नाही. काही अंतर्गत अडचण आली असेल म्हणून पालकमंत्रिपदाला स्टे दिला असेल. त्यावर लवकरच मार्ग काढला जाईल," अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे.
प्रशासन गोंधळता
प्रजसत्ताकदिनी ध्वजारोहण करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीत मंत्री गिरीश महाजन यांचेच नाव आल्याने तो प्रश्न सुटला आहे, त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व पत्रिका प्रसिद्ध करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, यादरम्यान दुसरा पालकमंत्री जाहीर करण्यात आला तर पत्रिकेत त्यांचे नाव समाविष्ट कसे करायचे, असा प्रश्न प्रशासनापुढे उपस्थित होत आहे. यावरून हा तिढा येत्या २६ तारखेपर्यंत सुटणार नाही असा देखील अर्थ काढला जात आहे.
दरम्यान, "शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कामकाजाची कार्यपद्धती वेगळी आहे. पहिल्या दिवसापासून शिक्षणपद्धतीत बदल करण्यासाठी त्यांचे सुरू असलेले प्रयत्न सगळे बघत आहेत. आम्हाला त्यांच्या पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा होती, परंतु लवकरच नाशिककरांना गुड न्यूज मिळेल," अशी आशा शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी व्यक्त केली आहे.