Woman strangled with wire; The assailant fled with the jewelery on his body | महिलेचा वायरने गळा आवळून खून; अंगावरील दागिणे घेऊन हल्लेखोर फरार

महिलेचा वायरने गळा आवळून खून; अंगावरील दागिणे घेऊन हल्लेखोर फरार

ठळक मुद्देशहरात गुन्हेगारी नियंत्रणात येत नसल्याने संताप मृतदेहाजवळच एक वायर आणि ओढणी आढळून आलीघराच्या दरवाजाला बाहेरुन कडी लावलेली

इंदिरानगर : पाथर्डीफाटा येथील म्हाडा घरकुल प्रकल्पाच्या 'सी-विंग'मधील दहाव्या मजल्यावरील सदनिकेत राहणाऱ्या भरत जाधव यांच्या घरात शनिवारी (दि.२४) दुपारच्या सुमारास काही अज्ञात चोरांनी प्रवेश करत त्यांना प्रतिकार करणाऱ्या भरत यांच्या पत्नी प्रणीला जाधव (२६) यांचा गळा आवळून खून करुन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, मोबाइल व घरात ठेवलेली दहा ते पंधरा हजारांची रोकड असा ऐवज घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

याबाबत अधिक माहिती अशी, पाथर्डीफाटा येथे असलेल्या घरकुल प्रकल्पाच्या बारा मजली इमारतींचा गृहप्रकल्प आहे. 'सी' विंगमधील दहाव्या मजल्यावर भरत हे त्यांच्या पत्नी प्रणीला यांच्यासोबत वास्तव्यास आहे. भरत हे सकाळी नेहमीप्रमाणे सातपुर येथील कंपनीत कामाला गेलेले होते. दुपारच्या सुमारास त्यांनी जेवणाच्या सुटीत पत्नीला मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न वारंवार केला; मात्र काहीही प्रतिसाद लाभला नाही. पत्नी प्रणिला गरोदर असल्याने त्यांची चिंता वाढली. भरत अर्ध्या तासात घरी पोहचले असता घराच्या दरवाजाला बाहेरुन कडी लावलेली त्यांना आढळली. त्यांनी घाईघाईने कडी उघडली असता समोर एका ब्लँकेटमध्ये पत्नी प्रणिला मृतावस्थेत पडलेली दिसून आली.

त्यांनी तत्काळ दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती कळविली. नियंत्रण कक्षातून त्वरित इंदिरानगर पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक नीलेश माईनकर हे पथकासह घटनास्थळी पोहचले. यावेळी घरात भरत जाधव रडत बसलेले होते. प्रणिला यांच्या मृतदेहाजवळच एक वायर आणि ओढणी आढळून आली. दरम्यान, तत्काळ श्वान पथकासह न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. संध्याकाळपर्यंत पोलिसांचा पंचनामा व परिसरात विचारपुस सुरु होती. शनिवारी रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. घरात प्रवेश करत एकट्या महिलेला लक्ष्य करुन लूट करुन हत्या करण्यात आल्याच्या प्रकारावरुन परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दसऱ्याच्या पुर्वसंध्येला झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सणासुदीचा काळ सुरु असतानाही शहरात गुन्हेगारी नियंत्रणात येत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

 

Web Title: Woman strangled with wire; The assailant fled with the jewelery on his body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.