पाण्याच्या टाकीत सापडला घरकाम करणाऱ्या महिलेचा मृतदेह; शेजारी पडलेल्या पर्सने समोर आणलं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 18:57 IST2025-07-21T18:55:11+5:302025-07-21T18:57:26+5:30
नाशिकमध्ये इमारतीच्या टाकीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती

पाण्याच्या टाकीत सापडला घरकाम करणाऱ्या महिलेचा मृतदेह; शेजारी पडलेल्या पर्सने समोर आणलं सत्य
Nashik Crime: नाशकात पाण्याच्या टाकीत एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. तपासानंतर एका घरकाम करणाऱ्या महिलेने पाण्याच्या टाकीत उडी घेऊन स्वतःला संपवलं. पोटाच्या आजाराला कंटाळून महिलेने इमारतीच्या गच्चीवर जाऊन पाण्याच्या टाकीत उडी घेत आत्महत्या केली. रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. अश्विनी गणेश इंगोले असं मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अश्विनी यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सुसाइड नोटमध्ये म्हटलं.
संत कबीरनगर येथील रहिवासी असलेल्या इंगोले या शनिवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे काळेनगरमधील सुयश अपार्टमेंटमध्ये घरकाम करण्यासाठी आल्या होत्या. काम आटोपून रात्री नऊ वाजता त्या तेथून निघाल्या पण अपार्टमेंटच्या बाहेर जाण्याऐवजी त्या गच्चीवर गेल्या. त्यानंतर पंधरा ते वीस फूट खोल असलेल्या टाकीवर चढून त्यांनी आतमध्ये उडी मारल्याचे पोलिसांना सांगितले. पाण्यात बुडून अश्विनी यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले.
अश्विनी या रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे त्यांचे कुटुंबिय त्यांच्या मोबाईलवर फोन लावत होते. मात्र कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरूवात केली पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर कुटुंबातील काही महिला अश्विनी जिथे काम करत होत्या त्या घराच्या गच्चीवर गेल्या. त्यावेळी त्यांना
मोबाइल, पर्स, ओढणी, चप्पल सापडली. संशय आल्याने त्यांनी टाकीवर चढून पाहिलं तेव्हा त्यांना धक्का बसला. टाकीच्या पाण्यामध्ये अश्विनी यांचा मृतदेह तरंगत होता. पोलिसांनी नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह टाकीतून बाहेर काढला आणि रुग्णालयात पाठवला.
गच्चीवर सापडलेल्या अश्विनी यांच्या पर्समध्ये आत्महत्येपूर्व लिहिलेली चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत त्यांनी, मी पोटाच्या आजारपणाला कंटाळून मी जीवाचे बरे-वाईट करत आहे, माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरले जाऊ नये, असं लिहीलं होतं. त्यावरुनच ही आत्महत्या असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला.
दरम्यान, नातेवाईकांनी याप्रकरणी संबंधित घरमालकाकडे चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर गंगापूर पोलिसांनी घरमालकाकडे रविवारी जाऊन चौकशी केली. अश्विनी यांच्या पर्समध्ये सापडलेली चिठ्ठी आणि घरमालकाचे हस्ताक्षरदेखील जुळवून बघितले. मात्र दोन्ही हस्ताक्षरे वेगवेगळी असल्याचे आढळली.