नाशकात स्टोव्हच्या भडक्यात विवाहितेचा मृत्यू ; दोघींनी घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 21:23 IST2019-09-13T21:20:54+5:302019-09-13T21:23:52+5:30
नाशिक शहरातील सिडको परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. यात एका महिलेचा स्टोव्हचा भडका होऊन गंभीररीत्या भाजल्याने मृत्यू झाला, तर दोन महिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

नाशकात स्टोव्हच्या भडक्यात विवाहितेचा मृत्यू ; दोघींनी घेतला गळफास
नाशिक : शहरातील सिडको परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिलांचामृत्यू झाला आहे. यात एका महिलेचा स्टोव्हचा भडका होऊन गंभीररीत्या भाजल्याने मृत्यू झाला, तर दोन महिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली असून, याबाबत अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणा प्रताप चौकातील औदुंबर थांब्याजवळील रहिवासी अमृता किशोर शिंपी (२०) हिने गुरुवारी (दि.१२) रात्री १० वाजेपूर्वी कपड्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर वृंदावननगर भागातील धर्मात्मा सोसायटी येथे राहणाऱ्या धनश्री भाऊराव भोये (२१) हिने शुक्रवारी (दि. १३) घरात साडीच्या साह्याने पंख्याला बांधून गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस हवालदार चव्हाण तपास करीत आहे, तर महाजननगर येथील मांडे मळा चाळीत राहणारी विवाहिता रेखा संजय कापुरे (३३) ही बुधवारी (दि ११) रात्री ९ वाजेच्या सुमारास स्टोव्हवर स्वयंपाक करीत असताना स्टोव्हचा भडका झाल्याने ८० टक्के भाजली होती. तिच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी जमादार शिंदे अधिक तपास करीत आहेत.