थकबाकीदारांसमोर वाजले ढोल

By Admin | Updated: April 1, 2016 00:02 IST2016-03-31T23:51:35+5:302016-04-01T00:02:18+5:30

सातपूर विभागाची कामगिरी : पंचवीस वर्षांत प्रथमच उद्दिष्टपूर्ती

Vessel drum in front of the defaulters | थकबाकीदारांसमोर वाजले ढोल

थकबाकीदारांसमोर वाजले ढोल

गोकुळ सोनवणे सातपूर
महापालिकेची थकबाकी वसुलीसाठी विशेष पथक स्थापन करून, ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करून आणि थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल- ताशाचा गजर करीत गेल्या पंचवीस वर्षांत प्रथमच विक्रमी वसुली करून उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न मनपाच्या सातपूर विभागीय कार्यालयाने केला आहे. मात्र २५ बंद कारखान्यांकडे असलेली जवळपास ९० लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे.
महापालिकेने सर्वप्रथम प्रत्येक मिळकतधारकास देयके वेळेवर देण्याचा प्रयत्न केला. वॉरंट, सूचना पत्र पाठविले. ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करण्यात आले. त्यानंतर पाच अधिकाऱ्यांचे एक वसुली पथक तयार केले. या पथकाला दररोजचे वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या पथकाच्या माध्यमातून जप्ती मोहीम सुरू केली. या मोहिमेत एक कंपनी, सहा गाळे आणि एक दुकान सील केले. मात्र काही बडे थकबाकीदार दाद देत नव्हते. म्हणून सोसायट्या आणि अपार्टमेंटच्या दारावर यादी चिकटवली. शिवाय आनंदवली आणि गंगापूर रोडवरील बड्या त्रासदायक थकबाकीदारांच्या घरापुढे वसुली ढोल-ताशे पथक पाठविल्याने बदनामीच्या भीतीने ही थकबाकी वसूल झाली आहे. या सर्व उपाययोजनांमुळे मागील वर्षापेक्षा पाणीपट्टी आणि घरपट्टीत तब्बल दोन कोटी रु पयांची वाढ झाली आहे. (वार्ताहर)

Web Title: Vessel drum in front of the defaulters