हिरावाडी पाटाजवळ मृत जनावरे फेकण्याचे प्रकार

By Admin | Updated: July 31, 2014 00:52 IST2014-07-31T00:41:15+5:302014-07-31T00:52:15+5:30

कारवाईची मागणी : नागरिकांना करावा लागतो दुर्गंधीचा सामना

Types of throwing cattle near Hirawadi Patra | हिरावाडी पाटाजवळ मृत जनावरे फेकण्याचे प्रकार

हिरावाडी पाटाजवळ मृत जनावरे फेकण्याचे प्रकार

पंचवटी : हिरावाडी परिसरात गायी, म्हशींचे गोठे थाटून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या काठेवाडी नागरिकांकडून मृत जनावरे हिरावाडीतील पाण्याच्या पाटालगत फेकून दिली जात असल्याने येथील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
मृत जनावरे पाटालगत फेकणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी हिरावाडीतील नागरिकांनी केली आहे. हिरावाडीतील कमलनगर, क्रीडा संकुल परिसरात काही काठेवाडी नागरिक राहत असून, हे नागरिक दुग्ध व्यवसाय करतात. एखाद्या आजाराने त्यांच्याजवळील गाय, म्हैस मृत झाली तर ते रात्रीच्या वेळी बैलगाडीत मृत जनावर टाकून हिरावाडी परिसरात असलेल्या पाण्याच्या पाटाजवळ आणून टाकतात. परिणामी येथील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, आरोग्य धोक्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मृत जनावरे उघड्यावर फेकून दुर्गंधी पसरविणाऱ्या तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या काठेवाडी नागरिकांविरुद्ध महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई करावी, अशी मागणी हिरावाडी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मृत जनावरांमुळे मोकाट श्वानांचाही उपद्रव वाढला असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे मृत जनावरे पाटालगत फेकण्याचे प्रकार सुरू झाले होते; मात्र त्यावेळी नागरिकांनी पंचवटी विभागीय कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता; मात्र आता प्रशासनाचे पुन्हा दुर्लक्ष झाल्याने परिस्थिती ‘जैसे थे’ निर्माण झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Types of throwing cattle near Hirawadi Patra