‘वाघेरा’ घाटात दुचाकी घसरताहेत : नाशिक-हरसूल-नाशिक प्रवास करताहेत, सावधान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 15:09 IST2018-05-15T15:09:20+5:302018-05-15T15:09:20+5:30
वाघेरा गाव ओलांडल्यानंतर उत्कर्ष व्यायामशाळेपासून पुढे तीसºया वळणावर मुख्य रस्त्यावर आॅइल सांडले आहे. हे आॅईल वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्यामुळे येथून मार्गक्रमण करताना दुचाकी घसरुन अपघात घडू लागले आहे

‘वाघेरा’ घाटात दुचाकी घसरताहेत : नाशिक-हरसूल-नाशिक प्रवास करताहेत, सावधान !
नाशिक : गिरणारे-हरसूल रस्त्यावरील वाघेरा घाटात नाशिककडून जाताना तीसऱ्या वळणावर दरीलगत रस्त्यावर आॅईल सांडल्याने अपघातांना निमंत्रण मीळत आहे. सकाळपासून अद्याप तीन दुचाकी या आॅईलवरुन घसरल्याने प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने या अपघातांमध्ये कोणीही गंभीर जखमी झाले नाही; मात्र उन्हाच्या तीव्रतेमुळे आॅईल अधिक जास्त प्रमाणात पसरून वाहने घसरण्याचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसून हरसूल पोलीसांना याप्रकरणी माहिती जागरुक नागरिकांच्या वतीने कळविण्यात आली आहे.
वाघेरा गाव ओलांडल्यानंतर उत्कर्ष व्यायामशाळेपासून पुढे तीस-या वळणावर मुख्य रस्त्यावर आॅइल सांडले आहे. हे आॅईल वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्यामुळे येथून मार्गक्रमण करताना दुचाकी घसरुन अपघात घडू लागले आहे. याबाबत अद्याप दुपारपर्यंत या निसरड्या रस्त्यावर माती टाकण्यात आलेली नव्हती. या रस्त्याला राज्य मार्गाचा दर्जा मिळालेला असून लहान-मोठ्या अवजड वाहनांसह आदिवासी गाव, पाड्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. साधारणत: सहा ते सात किलोमीटरचा वाघेरा घाट हा अत्यंत वळणावळणाचा असून घाटात तीव्र धोकादायक वळणे आहेत. या घाटामध्येच एका वळणावर आॅईलसारखा द्रवरुप पदार्थ सांडल्याने रस्ता निसरडा बनला असून दुचाकी घसरु लागल्या आहेत.
आदिवासी भागातील नागरिक दुचाकीवरुन एकापेक्षा अधिक प्रवास करत असल्यामुळे गंभीर अपघातासाठी हा निसरडा रस्ता कारणीभूत ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तातडीने या ठिकाणी संपूर्ण आॅईल पडलेल्या जागेवर दगड व खडी नसलेली माती टाकण्याची मागणी होत आहे.