दुर्दैवी : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार मित्रांचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 14:45 IST2020-11-10T14:45:31+5:302020-11-10T14:45:58+5:30
दोघे तरुण या अपघातात मृत्यूमुखी पडल्यामुळे या परिसरात ऐन दिपावलीच्या तोंडावर शोककळा पसरली.

दुर्दैवी : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार मित्रांचा मृत्यु
पंचवटी : औरंगाबाद महामार्गावरुन तपोवनमार्गे थेट टाकळी गावात जाणाऱ्या रिंगरोडवर मिर्ची चौफुलीलगतच्या सिग्नलवरुन भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार दोघा मित्रांचा मृत्यू झाला. रविववारी (दि.८) रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
टाकळी रोडवरील इंद्रायणी कॉलनीतील राहणारा रोहित संजय पिंगळे (२९) व त्याचा राहुलनगर येथील मित्र अतुल अशोक शिंदे (२९) हे दोघे त्यांच्या यामाहा एफझेड दुचाकीने (एम.एच.१५ जीडी ९७१५) मार्गस्थ होत असताना एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांना गंभीर मार लागला. रोहितच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अतुलला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरु असताना त्याची प्राणज्योत मालवली. इंद्रायणी कॉलनी, राहुलनगरमधील दोघे तरुण या अपघातात मृत्यूमुखी पडल्यामुळे या परिसरात ऐन दिपावलीच्या तोंडावर शोककळा पसरली. अचानकपणे झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिंदे व पिंगळे कुटुंबियांनी तरुण मुले गमावल्याने या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पुढील तपास हवालदार लोहकरे करीत आहेत.
--