बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरे ठार

By Admin | Updated: January 8, 2017 00:36 IST2017-01-08T00:35:49+5:302017-01-08T00:36:20+5:30

पाडळी : पिंजरा लावण्याची मागणी

Two calves killed in leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरे ठार

बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरे ठार

 ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पाडळी शिवारात शनिवारी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरे ठार झाल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून, वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पाडळी फाटा येथे गट नं. ९४ मध्ये नरहरी कृष्णा पाटोळे यांचे घर आहे. घराला लागूनच असलेल्या पडवीत शुक्रवारी रात्री दोन गायी, बैल, वासरे व म्हैस आदि जनावरे बांधलेली होती. पहाटे २ वाजता कंपनीतून घरी आलेल्या दीपक पाटोळे जनावरांना चारा टाकून घरात गेले होते. त्यानंतर
३ वाजेच्या सुमारास सिंधूबाई पाटोळे यांना जनावरांच्या ओरडण्याच्या आवाजाने जाग आली. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता बिबट्याने दोन वासरांचा फडशा पाडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी घरातील इतर कुटुंबीयांना जागे केल्यानंतर बिबट्याला पळवून लावण्यात आले. बिबट्याच्या हल्ल्यात एक जर्सी व एक गावठी प्रजातीची वासरे ठार झाल्याने पाटोळे यांचे सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशांत दांडगे, आकाश रुपवते यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. परिसरातील ग्रामस्थांना गेल्या काही दिवसांत अनेकदा बिबट्याचे दर्शन घडले
आहे. (वार्ताहर)

Web Title: Two calves killed in leopard attack