अडीच वर्षांनंतर होमग्राउण्डवर, आजपासून छगन भुजबळ नाशिक दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 13:04 IST2018-06-14T08:13:40+5:302018-06-14T13:04:42+5:30
10 जून रोजी त्यांनी पुणे येथील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात घणाघाती भाषण करून राजकारणातील कमबॅक केले होते.

अडीच वर्षांनंतर होमग्राउण्डवर, आजपासून छगन भुजबळ नाशिक दौऱ्यावर
नाशिक : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ सुमारे अडीच वर्षांनंतर आता नाशिकमध्ये म्हणजेच आपल्या होमग्राउण्डवर परतणार आहेत. येत्या गुरुवारी त्यांचे आगमन होणार असून, कार्यकर्त्यांनी स्वागताची तयारी केली आहे. महाराष्टसदन घोटाळा तसेच सक्तवसुली संचालनालय यामुळे चोवीस महिने कारागृहात राहिल्यानंतर छगन भुजबळ यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर भुजबळ हे मुंबईतच रुग्णालयात होते.
10 जून रोजी त्यांनी पुणे येथील राष्टवादी कॉँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात घणाघाती भाषण करून राजकारणातील कमबॅक केले होते. आता ते आजापासून नाशिकमध्ये येणार असून, दुपारी १२ वाजता पाथर्डी फाटा येथे आगमन झाल्यानंतर शिवछत्रपतींच्या पुतळ्याला तसेच तेथून गणेशवाडीत महात्मा फुले आणि त्यानंतर सीबीएसवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते कामकाजाला सुरुवात करतील. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार असून, त्यानंतर राष्ट्रवादी भवनात गेल्यानंतर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी ते येवला या आपल्या मतदारसंघात जाणार असून, तेथेदेखील अभ्यागतांसाठी वेळ देणार आहेत. त्यानंतर मात्र ते शिर्डीला जाणार असून, साईबाबांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर पुन्हा नाशिकमध्ये परतल्यानंतर शनिवारी कळवणला भेट देणार आहेत.