'तुषार आपटेचं भर चौकात मुंडके छाटा', स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करताच कालीचरण महाराज कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 15:38 IST2026-01-10T15:35:51+5:302026-01-10T15:38:18+5:30
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपाने स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केले. त्यानंतर प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

'तुषार आपटेचं भर चौकात मुंडके छाटा', स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करताच कालीचरण महाराज कडाडले
बदलापूरमधील एका शाळेत लहान मुलींवर अत्याचार करण्यात आला होता. या अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या तुषार आपटे याला भाजपाने थेट स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्त केले. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तुषार आपटेच्या नियुक्तीला कालीचरण महाराजांनीही विरोध केला आहे. 'तुषार आपटेला भर चौकात उभं करा आणि त्याचं मुंडके छाटा, असे विधान त्यांनी केले आहे.
बदलापूर-कुळगाव नगरपरिषदेची काही दिवसांपूर्वी निवडणूक पार पडली. या निवडणुकीनंतर भाजपाने घेतलेल्या एका निर्णयाने संतापाची लाट उसळली. बदलापूर येथील शाळेत लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीलाच भाजपाने नगरसेवकपदी नियुक्त केले.
बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी असलेल्या तुषार आपटे याला भाजपाने स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केले. त्यावर आता कालीचरण महाराज यांनी संताप व्यक्त केला. शिंदेसेना उमेदवारांच्या प्रचाराच्या सभेत कालीचरण महाराजांनी मुंडके छाटा अशी मागणी केली.
नाशिकमध्ये कालीचरण महाराज म्हणाले, "तुषार आपटेला भर चौकात उभं करा आणि त्याचे मुंडके छाटले पाहिजे. आरोप सिद्ध होत असतील तर कारवाई केलीच पाहिजे."
"आमचा उद्देश धर्म राज्याचा आहे. जे हिंदू हिताचे आचरण करतील, त्याला मतदान करा. दोन असतील, तर जो जास्त हिंदू आचरण करेल, त्याला मतदान करा. लोकांनी आपापल्या अनुभवावर उमेदवारांना निवडावे. हिंदूंचे विभाजन होत आहे. जे धर्म रक्षण करतात, त्यांना मतदान करा", असे विधान कालीचरण महाराजांनी केले.
"कोणत्याही देशात हिंदू सुरक्षित नाही. ही स्थिती भारतात देखील होऊ शकते. हिंदूंच्या रक्षणासाठी राजकारणाचे हिंदुकरण करणे महत्त्वाचे आहे. हिंदू मतदार हा आमचा अजेंडा आहे. जो भारत मातेचा उत्सव करेल त्याला मतदान करा", असेही ते म्हणाले.