नाशिकमध्ये पाझर तलावात बुडून तीन बालिका ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 22:42 IST2020-03-18T22:41:24+5:302020-03-18T22:42:37+5:30
तीघी जवळील एका पाझर तलावाजवळ खेळताना पाण्यात आंघोळीसाठी उतरल्या असता बुडाल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे.

नाशिकमध्ये पाझर तलावात बुडून तीन बालिका ठार
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साप्ते गावाजवळील शिवाजीनगर पाझर तलावात बुडून बुधवारी (दि.१८) तीन बालिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने संपुर्ण शिवाजीनगर, साप्ते शिवारात शोककळा पसरली आहे.
साप्ते गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवाजीनगर पाड्यावर राहणाऱ्या सोनू बेंडकोळी यांच्या मुली जिजा सोनू बेंडकोळी (९), धनश्री सोनू बेंडकोळी (७) तसेच स्वप्नीली यशवंत बेंडकोळी (५) या तीघी जवळील एका पाझर तलावाजवळ खेळताना पाण्यात आंघोळीसाठी उतरल्या असता बुडाल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. यावेळी त्यांच्यासोबत गावातीलच अंगणवाडीत शिकणारी बालिकाही होती. या तीघी पाण्यात बुडल्याचे लक्षात येताच त्या बालिकेने गावात येऊन आई-वडिलांना ही माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी धाव घेत तीन्ही चिमुकलींचे मृतदेह बाहेर काढले. घटनेची माहिती हरसूल पोलिसांना सरपंच राजू बेंडकोळी यांनी दिली. काही वेळेतच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तीन्ही मृतदेहांचा पंचनामा करून हरसूल पोलिसांनी मृतदेह जिल्हा शासकिय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविले. यामध्ये बेंडकोळी कुटुंबातील दोन्ही चिमुकल्या गतप्राण झाल्याने या कुटुंबावर आभाळ फाटले आहे. या दोन्ही बहीणी पेठ तालुक्यातील शासकिय आश्रमशाळेत शिकत होत्या. तसेच स्वप्नीली ही अंगणवाडिकेत अक्षरओळखचे धडे गिरवित होती. घटनेची माहिती मिळताच आमदार हिरामण खोसकर यांनी जिल्हा शासकिय रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी हरसूल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.