नाशिकचा कांदा शेतकऱ्याने वाहिला बाबा अमरनाथ चरणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 05:26 PM2023-07-18T17:26:01+5:302023-07-18T17:32:48+5:30

नैताळेच्या कांदा उत्पादक संजय साठे यांनी पाच किलो कांदे अमरनाथपुढे ठेवून केली शेतकऱ्यांसाठी प्रार्थना..

The farmer offered the onion of Nashik at the feet of Baba Amarnath | नाशिकचा कांदा शेतकऱ्याने वाहिला बाबा अमरनाथ चरणी

नाशिकचा कांदा शेतकऱ्याने वाहिला बाबा अमरनाथ चरणी

googlenewsNext

जम्मु-काश्मीर राज्यातील प्रसिद्ध देवस्थान व पवित्र गुंफा म्हणून बाबा अमरनाथ व तेथील यात्रा उत्सव देशात व देशाबाहेर प्रसिध्द आहे. नाशिक जिल्ह्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी आपल्या स्वतःच्या शेतातील पाच किलो कांदे बाबा अमरनाथ यांच्या चरणी वाहून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. 

नाशिकहून तब्बल सहा दिवसाच्या रेल्वे, घोड्यावरील,पायी प्रवासानंतर संजय साठे आणि त्यांच्या सोबतच्या शेतकरी भाविकांनी पाच किलो कांदा बाबा अमरनाथ (बाबा बर्फानी ) यांना अर्पण केला. तसेच, ‘कांदा पिकाला योग्य भाव मिळू दे...कांदा आयात निर्यातीचे योग्य धोरण ठरविण्यास केंद्र व राज्य सरकारला सुबुध्दी दे.....!’ अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली. त्यानंतर कांद्याचा प्रसाद तेथे उपस्थित असलेल्या व देशसेवेसाठी रात्र दिवस पहारा करणाऱ्या सैनिकांना दिला. 

अमरनाथ यात्रा उत्सव जम्मु-काश्मीर राज्यात १ जुलै २०२३ पासून सुरू झाला आहे. भगवान शंकराची पवित्र गुंफा म्हणून मोठा नावलौकिक आहे. टप्या,टप्याने अनेक राज्यातील भाविक बाबा अमरनाथच्या दर्शनासाठी प्रवास करत आहे. या नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी श्री साठे यांनी आणलेले कांदे पवित्र गुंफेसमोर असलेल्या दानपेटीला स्पर्श करून पुजाऱ्यांनी परत दिले. तेच कांदे साठे यांनी तेथे यात्रेकरूंच्या संरक्षणासाठी असलेल्या भारतीय लष्करी जवानांसाठी एका जवानाकडे सुपूर्त केले. यावेळेस त्यांच्याबरोबर शेतकरी बाजीराव अभंग. दिलीप घायाळ. श्रीकांत मंडलिक. दिलीप निकम, पवन वाकचौरे, संतोष घायाळ, ज्ञानेश्वर देसले, गणेश जेऊघाले हेही होते.

अनेक जण देवापुढे पेढ्याचा प्रसाद ठेवतात हारगुच्छ वाहतात मी पण माझ्या शेतात रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेले कांदे सर्व भारतीय शेतकऱ्यांच्या वतीने बाबा अमरनाथ गुंफेत ठेवून देशासाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सीमेवर पहारा देतात अशा जवानांना ते दिले आहेत. तसेच शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळावा अशी प्रार्थनाही केली आहे.
-संजय साठे, कांदा उत्पादक, नैताळे, जि. नाशिक

Web Title: The farmer offered the onion of Nashik at the feet of Baba Amarnath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.