नाशिक ते कर्नाटक...४०० कोटींच्या नोटा गायब; ५ अटकेत, काहीच घडलं नसल्याचे पोलिसांचे म्हणणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 13:44 IST2026-01-24T13:33:34+5:302026-01-24T13:44:47+5:30

नाशिकच्या तरुणाचे अपहरण केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.

The 400 Crore Mystery Missing Container of 2000 Notes Triggers SIT Probe in Nashik | नाशिक ते कर्नाटक...४०० कोटींच्या नोटा गायब; ५ अटकेत, काहीच घडलं नसल्याचे पोलिसांचे म्हणणं

नाशिक ते कर्नाटक...४०० कोटींच्या नोटा गायब; ५ अटकेत, काहीच घडलं नसल्याचे पोलिसांचे म्हणणं

Nashik 400 Crore Container Theft: कर्नाटकच्या चोरली घाटात ४०० कोटी रुपयांच्या जुन्या २ हजारच्या नोटांनी भरलेला कंटेनर चोरीला गेल्याच्या संशयाने राज्याच्या राजकीय आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या कथित चोरीच्या आरोपावरून नाशिकमधील एका तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून नाशिक ग्रामीण पोलिसांनी आता एसआयटी स्थापन केली असून, तपासाची चक्रे कर्नाटकपर्यंत फिरू लागली आहेत.

नेमकं प्रकरण काय?

नाशिकमधील इगतपुरी येथील संदीप पाटील यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, दोन महिन्यांपूर्वी गोव्याहून कर्नाटकच्या एका देवस्थानाकडे ४०० कोटी रुपयांच्या २ हजारच्या नोटा घेऊन एक कंटेनर जात होता. चोरली घाटात हा कंटेनर चोरीला गेल्याचा संशय असून, त्या चोरीचा आरोप संदीप पाटील यांच्यावर ठेवण्यात आला. यावरून काही जणांनी त्यांचे अपहरण केले, त्यांना अज्ञात स्थळी नेऊन बेदम मारहाण केली आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.

पोलीस अधिकारी आणि बड्या व्यावसायिकांचे कनेक्शन?

संदीप पाटील यांच्या तक्रारीने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. चोरीला गेलेली ही अवाढव्य रक्कम मुंबई-ठाण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाची असून, या संपूर्ण कटात पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही हात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे ही केवळ लुटीची घटना नसून एक मोठे संघटित गुन्हेगारीचे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नाशिक ग्रामीण पोलिसांची आक्रमक कारवाई

नाशिक ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवत जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी आणि जनार्दन धायगुडे या ५ संशयितांना अटक केली आहे. तर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटी आता महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात अशा तीन राज्यांतून पुरावे गोळा करत आहे.

बेळगाव पोलिसांचा धक्कादायक दावा

एकीकडे नाशिक पोलीस तपास करत असतानाच, बेळगावच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मात्र असा कोणताही कंटेनर चोरीला गेल्याचा दावा फेटाळून लावला आहे. "चोरली घाट परिसरात अशी कोणतीही घटना घडलेली नाही," असे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. व्ही. हिरेमठ यांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांच्या या परस्परविरोधी विधानांमुळे ४०० कोटींच्या नोटा नक्की गेल्या कुठे? असा प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
 

Web Title : नासिक: 400 करोड़ की नोटें गायब, चोरी का दावा विवादित, पांच गिरफ्तार

Web Summary : कर्नाटक के पास से 400 करोड़ रुपये के पुराने नोटों से भरा कंटेनर कथित तौर पर चोरी होने से जांच शुरू। नासिक के एक व्यक्ति का अपहरण, चोरी का आरोप। पुलिस ने पांच को गिरफ्तार किया, कर्नाटक पुलिस ने इनकार किया।

Web Title : Nashik: 400 Crore Missing Notes, Theft Claim Disputed, Five Arrested

Web Summary : A container with ₹400 crore in old notes allegedly stolen near Karnataka sparks investigation. A Nashik man was abducted and beaten, accused of the theft. Police arrested five, but Karnataka police deny any such incident, deepening mystery.