कर वसुली सुसाट, महापालिका जोमात; ५ महिन्यात ६० टक्क्यांहून अधिक वसुली

By Suyog.joshi | Published: September 15, 2023 04:39 PM2023-09-15T16:39:58+5:302023-09-15T16:41:42+5:30

गतवर्षी करसंकलन विभागाने १८८ कोटी मालमत्ताकर वसूल केला होता. त्यासाठी ढोल बजाओ मोहीम हाती घेत वसुलीसाठी मोठा घाम गाळावा लागला होता.

Tax collection increased in Nashik municipal; More than 60 percent recovery in 5 months | कर वसुली सुसाट, महापालिका जोमात; ५ महिन्यात ६० टक्क्यांहून अधिक वसुली

कर वसुली सुसाट, महापालिका जोमात; ५ महिन्यात ६० टक्क्यांहून अधिक वसुली

googlenewsNext

नाशिक : महापालिकेच्या करसंकलन विभागाला यंदा २०५ कोटींचे उद्दिष्ट असून पाच महिन्यातच साठ टक्क्याहून अधिकची वसुली करण्यात पालिकेला यश आले आहे. पाच महिन्यात १२१ कोटींची वसुली झाली असून गतवर्षीच्या तुलनेत ३१ कोटीने पुढे असल्याचे उपायुक्त श्रीकांत पवार यांनी सांगितले.

महापालिकेची घरपट्टीची थकबाकी राहू नये याकरिता यंदाच्या वर्षापासून करसंकलन विभागाने जोरदार आघाडी उघडली आहे. एप्रिल ते ११ सप्टेंबर दरम्यान करसंकलन विभागाने तब्बल १२१.६४ कोटींची मालमत्ताकर वसुली केली आहे. यातील विशेष बाब म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत ही वसुली ३१ कोटी ६४ लाखांनी पुढे आहे. मागील वर्षी अवघी ९० कोटींची वसुली करण्यात पालिकेची दमछाक झालेली होती. मात्र यंदा पालिकेने योग्य नियोजन करत कर वसुलीला गती दिली आहे. उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत नगररचना व करसंकलन विभाग आहे.

गतवर्षी करसंकलन विभागाने १८८ कोटी मालमत्ताकर वसूल केला होता. त्यासाठी ढोल बजाओ मोहीम हाती घेत वसुलीसाठी मोठा घाम गाळावा लागला होता. मार्च अखेर तत्कालीन आयुक्तांनी दिलेले उद्दिष्ट साध्य करता आले होते. यंदा मात्र करसंकलन विभाग वसुलीत जोरात आहे. करसंकलन उपायुक्त श्रीकांत पवार यांनी विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नियोजन पद्धतीने वसुलीवर काम सुरु असून मागील साडेचार महिन्यातच मालमत्ताकर वसुली आकड्याने मोठी झेप घेतली आहे. १ एप्रिल ते ३० जून या सवलतीच्या कालावधीत जवळपास मालमत्ताकर वसुलीने शंभर कोटींचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर दीड महिन्याच्या कालावधीतही वसुलीला उत्तम प्रतिसाद असून हा आकडा आता थेट १२१ कोटींच्या पुढे पोहचला आहे. सद्यस्थितीत महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे.

आयुक्तांनी करसंकलन विभागाला मालमत्ताकर वसुलीचे २१० कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. गतवेळेस डिसेंबर अखेर वसुलीचा आकडा १२१ कोटींवर पोहचला होता. मात्र यंदा हाच आकडा सप्टेंबर मध्ये गाठण्यात कर संकलन विभागाला यश आले आहे. नागरिक रोख, धनादेश, डीडी, आरटीजीएस व इ-पेमेंटच्या माध्यमातून कर भरत आहेत. पाणीपट्टीचे यंदा ७५ कोटीचे उद्दिष्ट असून आतापर्यंत १६ कोटींची वसुली झाली आहे.

आतापर्यंत करसंकलन विभागाने १२१.६४ कोटींचा मालमत्ता कर वसूल केला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी २०५ कोटींचे उद्दिष्ट आहेे. शहरातील ज्या नागरिकांनी अद्यापही त्यांची घरपट्टी भरली नसेल ती त्यांनी लवकरात लवकर भरुन पालिकेला सहकार्य करावे. - श्रीकांत पवार, उपायुक्त करसंकलन, मनपा

Web Title: Tax collection increased in Nashik municipal; More than 60 percent recovery in 5 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.