सातबारा उताऱ्यावरील नोंद रद्द प्रक्रिया सोपी

By Admin | Updated: July 28, 2014 00:52 IST2014-07-27T22:27:24+5:302014-07-28T00:52:07+5:30

शासनाचा आदेश : शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

Simplified entry canceled process simplified | सातबारा उताऱ्यावरील नोंद रद्द प्रक्रिया सोपी

सातबारा उताऱ्यावरील नोंद रद्द प्रक्रिया सोपी

दिंडोरी : जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील मुंबई कूळ वहिवाट व शेतजमीन १९४८ चे कलम ४३ ची नोंद (नवी शर्थ) रद्द करण्यासाठीच्या किचकट पद्धतीला शासनाने शिथिलता आणत आता गावातील तलाठ्याकडेच ही नोंद रद्द होण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहे.
दिंडोरी तालुक्यात १ ते १५ आॅगस्ट दरम्यान या नोंदी रद्द करण्यासाठी विशेष राजस्व अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी मुकेश भोगे यांनी दिली.
शासनाच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, मंत्रालयाचे हेलपाटे वाचणार आहे. त्याचबरोबर यापूर्वी केवळ जमीन विकायची असेल तर नोंद कमी करता येत होती. त्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. आता ती अट शिथिल झाली असून, ज्या शेतकऱ्याच्या उताऱ्यावर नोंदी आहे त्याही कमी करता येणार आहे.
दिंडोरी तहसील कार्यालयाने मंडळ अधिकारी व तलाठी यांना तशा सूचना दिल्या असून, गावोगावी खातेधारकांना सदर आदेशाची माहिती देण्यात येत आहे. १ ते १५ आॅगस्टपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन करून नोंदी रद्द करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
कूळ वहिवाटीची अट रद्द करण्यासाठी तलाठ्या मार्फत विहित नमुन्यात अर्ज करून महसूल आकारणीच्या चाळीस पट नजराणा शेतकऱ्यांना चलनाने तहसील कार्यालयात भरावा लागणार आहे. जमीन खरेदीदार हा शेतकरी असणे गरजेचे आहे.
या योजनेचा फायदा घेऊन पात्र शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी संपर्क साधून सदर नोंदी कमी करून घ्याव्या, असे आवाहन प्रांताधिकारी मुकेश भोगे यांनी केले आहे . (वार्ताहर)

Web Title: Simplified entry canceled process simplified