जनता कर्फ्यूत अडकला सलून व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 02:01 IST2020-07-11T20:51:52+5:302020-07-12T02:01:56+5:30
देवळा : शहरातील सलून व्यावसायिकांची दुकाने २२ मार्चपासून लॉकडाऊननंतर आजपर्यंत बंदच असल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे देवळा शहरात १३ जुलैपर्यंत असलेला जनता कर्फ्यू संपण्याची प्रतीक्षा आता शहरातील ३५ सलून व्यवसायिक करीत आहेत.

जनता कर्फ्यूत अडकला सलून व्यवसाय
देवळा : शहरातील सलून व्यावसायिकांची दुकाने २२ मार्चपासून लॉकडाऊननंतर आजपर्यंत बंदच असल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे देवळा शहरात १३ जुलैपर्यंत असलेला जनता कर्फ्यू संपण्याची प्रतीक्षा आता शहरातील ३५ सलून व्यवसायिक करीत आहेत.
देशात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. त्याचा सर्व छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायांना आर्थिक फटका बसला. देवळा शहरातील सर्व सलूनची दुकाने चार महिन्यांपासून बंदच आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतर इतर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. परंतु सलून व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका सर्वाधिक असल्याचे कारण देऊन त्यांना दुकाने उघडण्यास परवानगी दिली जात नाही. यामुळे सलून चालकांना कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे. बहुतेक सलून चालकांना शेती वा दुसरे उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे त्यांचे सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह दुकानावर अवलंबून आहे. परंतु दुकान बंद असल्यामुळे आर्थिक आवक बंद झाल्यामुळे त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली.
-----------------
..अन् दुकाने
उघडलीच नाहीत !
२८ जूनपासून शहरातील सलून-चालकांना देवळा नगरपंचायतीने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करून दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. परंतु दुर्दैवाने देवळा शहरात २८ जून रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यामुळे जनता कर्फ्यू घोषित झाला व दुकाने बंदच राहिली. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली व ४ जुलैपर्यंत रु ग्णांची संख्या १८ झाली. परंतु त्यानंतर मात्र शहरात आतापर्यंत एकही पॉझिटिव्ह रु ग्ण आढळून आला नाही. यामुळे १३ जुलैपर्यंत असलेल्या जनता कर्फ्यूनंतर दुकाने उघडण्याची प्रतीक्षा शहरातील सलून व्यावसायिक करीत आहेत.
-----------
दुकान बंद असल्यामुळे दैनंदिन खर्च, व्यवसायासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे ह्या चिंतेत आहे. शहरातील ज्या भागात कोरानाचे रुग्ण सापडतील तो भाग सील करावा व उर्वरित शहरात दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. दुकान उघडल्यानंतर शासनाने निर्देशित केलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करू.
- हेमराज पगार, सलून व्यावसायिक, देवळा